
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -राहुल रोडे
लातूर :- माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीच्या आधारावर दोन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. माधव आबाजी सूर्यवंशी (वय 36, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, एलआयसी कॉलनी, लातूर) आणि सचिन उर्फ – गोवर्धन चंद्रकांत आकनगिरे (वय 36, रा. स्वराज्य नगर, लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लातूर येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. त्यांच्या कंपनीमार्फत लातूरतील विविध प्रशासकीय विभागास वाहनांचा पुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी माधव सूर्यवंशी नावाच्या इसमाने माहिती अधिकारात संबंधित विभागाकडून माहिती मागवून ‘तुम्ही जीएसटी भरत नाहीत, गाड्यांचे किलोमीटर जास्त दाखवतात’ असे म्हणत तक्रारदाराकडे खंडणीची मागणी केली. तसेच कुटुंबियांनी जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार फिर्यादीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली.
आरोपीने खंडणीची रक्कम घेऊन लातूर जिल्हापरिषदेच्या आवारमध्ये बोलावले होते. पोलिसांनी पंचांसह सापळा लावला आणि तक्रारदाराकडून खंडणीची रक्कम घेत असताना माधव सूर्यवंशी व त्याचा सहकारी सचिन आकनगिरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात भादवि कलम 384,385, 386, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड हे करीत आहेत.