
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर
पुणे: राज्यातील कोरोना संसर्गाची आकडेवारी गेल्या काही दिवसापासून वाढताना दिसते आहे. पुण्यातही रुग्ण संख्या हळू हळू का होईना पण वाढते आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेने ‘हर घर दस्तक’ ही मोहीम सुरू केली. पण या मोहिमेदरम्यान लसीकरणाचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पुण्यातील जवळपास १३ लाख नागरिकांनी कोरोनाप्रतिबंधक दुसरी लस घेतलेली नाही.
तर ‘हर घर दस्तक’ या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ७० हजार लोकांनी लस घेतली. या मोहिमेशी संबधित आरोग्य सेवकांनी जवळपास ६.४ लाख घरांना भेटी दिल्या आहेत. यापैकी ६९३३२ प्रौढ व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला.
तर १८ वर्षावरील ५८ हजार व्यक्तींनी बुस्टर डोस घेतला आहे.
याबाबत लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर म्हणतात की, या लसीची सक्ती करता येत नसल्याने अनेकजण लस घेण्यास नकार देतात. पुणे महानगर पालिका क्षेत्रात ५ लाख लोक दुस-या डोसबाबत उदासीन दिसून येतात. करोनाला सक्षम लढा देण्यासाठी गेल्या वर्षातील जानेवारी महिन्यापासून करोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली.