
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर
पुणे : ‘महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणा’ने (महारेरा) नुकत्याच दिलेल्या निकालामुळे रखडलेले अनेक पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. महारेराच्या सलोखा मंचाने यासाठी पुढाकार घेतल्यामुळे डीएसके सदाफुली हा तळेगाव येथील गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होण्याची आशा आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी महारेराने निवृत्त उच्चपदस्थ अधिकाऱ्याची देखरेखीसाठी नियुक्तीही केली आहे. त्यामुळे दीडशेहून अधिक खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.
पुण्यातील एकेकाळचे नामांकित विकासक डी. एस. कुलकर्णी यांच्या तळेगाव येथील ‘डीएसके सदाफुली गृहनिर्माण प्रकल्पा’तील २७९ सदनिकांच्या तीन इमारतींचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले होते. या प्रकल्पात १४९ खरेदीदारांनी मोठी रक्कम भरून विक्री करारनामे केले, मात्र हा प्रकल्प ठप्प झाला होता. विकासक तुरुंगात गेल्याने काय करावे हे या खरेदीदारांना सुचत नव्हते. त्यांनी मुंबई ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली. खरेदीदारांनी एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण स्थापन करून महारेराची परवानगी मागितली.