
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- मेळघाटमध्ये संततधार पावसाचे चित्र दिसत आहे.जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्याबरोबर मेळघाटातील काही गावांमद्धे नागरिक दुषित पाण्याचा वापर करतांना दिसत आहे.पिण्यासाठी वापरात असलेल्या विहिरीमद्धे संपूर्णतः दुषित पाणी आहे.अगोदरच पाचडोंगरी व कोयलारी येथे दुषित पाण्याच्या वापरामुळे अतिसाराचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला ह्यामुळे तेथील चार नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतांना आता आणि असाच प्रकार चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या तोरणवाडी गावात पाहायला मिळाला.
तोरणवाडी या गावात प्रशासन स्वतःहून टँकरने पाणी पुरवठा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले जात आहे.परंतु हे गाव मोठे असल्याकारणाने फक्त एक टँकर पाणी पाठविलं जात आणि ते फक्त गावातील एकाच भागात संपत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.जिथे नदी-नाल्या ओलांडून आपला जीव धोक्यात घालून येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.त्यांना कोणत्याही प्रकारे टँकरने पाणी पुरवठा केल्या जात नाही.दुषित पाण्याचा वापरवर जिल्हा प्रशासनासह गावातील काही नागरिकांनी चिखलदरा गटविकास अधिकारी यांना सुद्धा कळविले असल्याचे समजले.जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या विहिरी किंवा गावानजीक असलेल्या शेतातून नागरिक पाणी आणण्यासाठी संघर्ष करीत असतांना दिसत आहेत.तोरणवाडी गावाचा समावेश अत्यंत दुर्गम गावात होतो.येथे येण्या-जाण्यासाठी कोणत्याही सोई-सुविधा उपलब्ध नाहीत.येथील नागरीकांना आपल्या कामांसाठी पायी किंवा आपल्या वाहनांच्या साहाय्याने शहर गाठावे लागते.अश्यातच तोरणवाडी गाव हे दुषित पाण्याच्या समस्येने पूर्णतः ग्रासलेले दिसत आहे.ह्या गावांतील उद्भवत असलेल्या प्रश्नाकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी तोरणवाडी या गावातील नागरिकांनी केली आहे.