
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा बचाव केला. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. रमेश मोरे ची हत्या कुणी केली? माझी पण सुपारी दिली होती, पण मी सुदैवाने वाचलो, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
वारसा रक्ताने नव्हे विचाराने मिळतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचं ऐकलं नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचं ऐकलं, असं उत्तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा, माझ्या वडिलांचा फोटो का वापरता? असा सवाल बंडखोरांना केला होता. यावर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिवाय, अडीच वर्षात काय केलं? तेव्हा मराठी माणूस, हिंदुत्व आठवलं नाही का? असा सवाल केला.
सत्तेतून बाहेर पडल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतोय. सत्ता गेल्यानंतर जळफळाट आणि केविलवाणी व्यथा आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानं उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. या व्यक्तीला मी 40 वर्ष ओळखतो, अंगात खोटेपणा, कपटीपणा, द्वेष आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या तुफानी मुलाखतीवर प्रेस घेतोय. संजय राऊत यांनी आधीच उत्तरं सांगितलेली होती, अशी त्यांची मुलाखत होती, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. आजारपण आणि मातोश्री यातच मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गेली. आता स्वतःचं पद एकनाथ शिंदे यांना मिळालं याच्या पोटशुळातून त्यांनी मुलाखत दिली, असे राणे म्हणाले. आता संजय राऊत मनातून खुश आहे. माझ्या गुरूंनी, शरद पवारांनी सोपवलेलं काम फत्ते केलं, अशी टीका राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.