
दैनिक चालु वार्ता कुडाळ प्रतिनिधि- साहिल पठान
आज तुमच्या जन्माला १०२ वर्षे पूर्ण झाली. तुमचा जन्मसोहळा आज संपूर्ण जगभरामध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. खरंतर तुम्ही भल्याभल्या साहित्यिक, कवी, शाहीर आणि अभ्यासकांना न उलगडलेले एक कोडे आहात; कारण दीड दिवसांची शाळा शिकुन कोणी शेकडो कथा, कादंबऱ्या, पुस्तके, प्रवासवर्णने, पोवाडे, वग, गण, लावणी, पटकथा, लोकनाट्य लिहू शकतं का हा आजपर्यंत सर्वानाच अनुत्तरीत करणारा प्रश्न राहिलेला आहे.
अण्णा तुमचं गाव हे वारणेच्या खोऱ्यातलं वाटेगाव. तुमचं नाव तुकाराम असलं, तरी घरी तुम्हाला सर्वजण अण्णा म्हणायचे. तुमच्या घरात अठरा विश्वाचं दारिद्र्य, वडील पडेल ते काम करायचे परंपरागत जातव्यवसाय, जातीने समाजात अपमानाची वागणूक, पावलागणिक अपमान आणि अवहेलना त्यातच तुम्ही धरलेली मुंबईची वाट, मुंबईत आल्यावर तुमचा जगण्या मरण्यासाठी झालेला संघर्ष आजही लढण्याचं बळ देतो.
तुम्ही मुंबईत आल्यावर तुम्हाला दिसलेली मुंबई कवितेत रेखाटताना सांगता –
” मुंबईत उंचावरी मलबारहिल इंद्रपुरी
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती…
परळात राहणारे रातदिसं राबणारे
मिळलं ते खावून घाम गाळती…”
असं म्हणत तुमच्या डोळ्याला दिसलेली गरीब – श्रीमंताची मुंबई तुम्ही जगासमोर मांडलीत.
अण्णा तुम्ही मितभाषी होता याचा गैरफायदा सर्वांनीच घेतला. अण्णा तुम्ही अबोल राहून लाखो लोकांना बोलतं केलंत. तुम्ही कधीही आपल्या दुः खाचं आणि परिस्थितीचं भांडवल केलं नाही तुम्ही आलेल्या परिस्थितीत खंबीरपणे उभे राहिलात कारण तुम्हाला संपूर्ण समाजाला स्वाभिमान आणि स्वावलंनाच्या पायावर भक्कमपणे उभे करायचे होते.
अण्णा तुम्ही जे काही लिहलं ते तुम्ही सोसलेलं होतंत; त्यामुळेच तुमचा प्रत्येक शब्द न शब्द काळजावर कोरून ठेवावा एवढ्या प्रचंड ताकदीचा आहे. तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या गरिबीचा, पिळवणूकीचा, अंधश्रद्धेचा, अज्ञानाचा आणि त्याच्या काळजाचा ठाव घेतलात आणि एकेक बंडखोर नायक आणि नायिका उभ्या राहिल्या ; मग तो वारणेच्या खोऱ्यातला “वारणेचा वाघ” सत्त्याप्पा भोसले असेल ज्याने सावकार आणि इंग्रजांना धडकी भरवली होती ज्याला गावागावांतील आया – बहिणी आपला भाऊ आणि मुलगा मानायला लागेल. जात्यावरच्या ओव्यांमध्ये आया बाया म्हणायच्या
सत्तु धर्माचा भाऊ माझा
सत्तू डोंगराचा राजा…
एवढं प्रेम या वारणेच्या वाघाने लोकांवर आणि लोकांनी या वारणेच्या वाघावर म्हणजेच सत्त्याप्पावर केले होते.
तुमचा दुसरा नायक म्हणजेच तुमचा मामा ‘फकिरा”हा इंग्रज सैन्याला सळो की पळो करून सोडत होता.
१ ऑगस्ट १९२० साली बेडसगावचा खजिना लुटून तुमचा मामा ” फकिरा ” आपल्या सहकाऱ्यांसह मध्यरात्री वाटेगावच्या मांगवाड्यात आला आणि तुमच्या वडिलांना हाका मारू लागला परंतु ते घरी नसल्याने तुमची आत्या पुढे आली आणि दारी आलेल्या फाकिराला घरात बाळ जन्मल्याची बातमी दिली. तेव्हा तुमच्या मामाला – फकिराला एवढा आनंद झाला, की त्याने आपल्या झोळीतून दोन ओंजळी सुरती रुपये आत्याच्या
ओंजळीत घातले आणि सांगितलं, की ‘ हा क्रांतीचा पैसा आहे आणि या क्रांतीच्या पैशातून बाळाला बाळघुटी पाजा.’ अण्णा तेव्हाची तुमची परिस्थीती एवढी भयानक होती, की बाळघुटी घ्यायला देखील घरातल्यांकडे पैसा नव्हता. अशावेळी ‘तुम्ही फकिराने इंग्रजी खजिन्याच्या केलेल्या लुटीतून घुटी प्यायलात…’ त्यामुळेच फकिराचा हाच क्रांतीचा लढवय्या बाणा तुम्ही घेतलात.
अण्णा तुम्ही कधी तमासगीर असलेल्या “वैजयंता ” चा स्वाभिमानी बाणा आम्हाला दाखविलात, तर कधी वेश्या व्यवसायाच्या दलदलीत येण्यापासून आपल्या बहिणीला परावृत्त करणारी स्वाभिमानी आणि लढाऊ बाण्याची “चित्रा” तुमच्या कादंबरीची नायिका झाली. कधी ‘बरबाद्या कंजारी’ तर कधी “गजाआड” असणारा एकेक आरोपी बाहेर काढून त्याच्यातील अस्वस्थ नायक तुम्ही बाहेर काढून त्याच्या आतबाहेर चाललेला “संघर्ष ” तुम्ही जगभरात पोहोचवलात.
स्मशानातील मयताच्या कवटीतून सोनं काढणारा आणि आपल्या उपाशी पोरांना सोन्याचा घास भरवणारा, ‘स्मशानातील सोनं’ काढणारा भीमा हजारो वर्षांत कोणीच जगासमोर आणला नव्हता. तुमची लेखणी तर त्या स्मशानातही पोचली. एवढंच काय तर तुम्ही “रशियाचा प्रवास” करत ‘ लेनिन ‘ पर्यंत पोहोचलात. जो लेनिन त्या काळी रशियाचा सत्ताधीश होता, जो तुमचं आणि तुमच्या ‘फकिराचं’ कौतुक तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंना सांगतो पण नेहरुंना तुमचं नावही माहिती नव्हतं हे दुर्दैव… पण जगाने आणि एका सत्ताधीशाने तुमचं आणि तुमच्या ‘ फकिराचं ‘ नाव जगाच्या पटलावर अजरामर केलं हीच तुमची आणि तुमच्या झुंजार लेखणीची पोचपावतीच म्हणावी लागेल.
अण्णा तुम्ही कधी लेनिनग्राडचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा गाऊन तुम्ही जनमत तयार केलंत. तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये गावून महाराजांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचविणारे तुम्ही “जागतिक कीर्तीचे ” आणि काळाच्याही पुढचे “लोकशाहीर आणि शिवशाहीर” होता.
अण्णा तुमचं साहित्य हे नेहमीच तुमच्या जातीला बघून उपेक्षित राहिलं. तुमचं साहित्य वाचत असताना, एकाचवेळी आनंद, दु:ख, प्रेम, संताप, राग, चीड , बंडखोरी, अन्यायाविरोधात पेटून उठलेले बंडखोर क्रांतिकारक पाहायला मिळतात. गावकुसाबाहेरच्या महार – मांग – रामोशी – बेरड – भटक्या जातीतील माणसाला तुम्ही नायक आणि नायिका केलंत. तुमच्या या नायक नायिकांनी भांडवलशाही, जात – पंथ – धर्मव्यवस्था, सावकारशाही यांना सुरंग लावला. अण्णा या देशातील प्रस्थापित साहित्यिकांनी तुमच्या साहित्यिक प्रतिभेकडे जाणून बुजून जातीय अभिनिवेशातून, जातीय अहंगंडातून डोळेझाक जरी केली असली, तरी अण्णा तुमचं साहित्य हे जगभरातील विविध भाषांत भाषांतरीत होऊन जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. आज तुम्हाला संपूर्ण जग हे ” मॅक्झिम गॉर्की ऑफ महाराष्ट्र ” म्हणूनच ओळखतं यातच तुमचं आणि तुमच्या साहित्याचे मोठेपण आहे.
अण्णा तुम्ही जेव्हा दांडपट्टा चालवायचात ना तेव्हा तो दांडपट्टा इथल्या जातिव्यवस्थेवर चालवत होतात कारण त्याच वेळी तुमची लेखनीही जातिव्यवस्थेवर घाव घालण्यास सज्ज झालेली आम्हाला दिसत होती, तीच लेखणी तुम्ही डॉ. बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण करून “फकिरा” सातासमुद्रापार नेऊन पोहोचवलात. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चालवत असलेला दांडपट्टा इथल्या प्रत्येक महारामांगाच्या हातात दिला असता, तर हा देश कधीच कोणा सत्ताधीशाचा गुलाम झाला नसता.
अण्णा तुमचं तत्त्वज्ञान पृथ्वीला श्रमिकांच्या हातावर उभं करणारं असं होतं. तुम्ही म्हणाला होतात, की “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, इथल्या श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि बहुजनांच्या तळहातावर तरलेली आहे, असं सांगत कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा आणि बहुजनांचा लढा तुम्ही उभा केलात. लोकांना डोळस आणि विज्ञानिष्ठ बनवलंत, अंधश्रद्धेला मूठमाती दिलीत. तुम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहून मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे असं सांगून बेळगाव, निपाणी, कारवारसह महाराष्ट्राच्या सीमेवरील अनेक गावेदेखील आमचीच आहेत असं ठणकावून सांगत संयुक्त महाराष्ट्राचा लढा गतिमान करणारे तुम्ही एवढं धैर्य कसं आलं तुमच्यात…
अण्णा हा देश स्वतंत्र झाल्यानंतरही जे स्वातंत्र्य आमची भूक भागवू शकत नाही, जे स्वातंत्र्य काहींना भाकरी, वस्त्र आणि राहायला निवारा देतं, परंतु काहींना उपाशी, उघडं आणि बेघर ठेवतं, ते स्वातंत्र्य खोटं आहे असं म्हणत स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी भुके, कंगाल लोकांचा मोर्चा काढणारे तुम्ही खरंच काळाच्याही पुढचे क्रांतिकारक आहात.
अण्णा ज्या समाजात परंपरागत आणि जातीव्यवस्थेने घालून दिलेल्या कामांना इथल्या व्यवस्थेने हलक्या दर्जाचं ठरवून दिलं ; जी कामे माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतात ती कामे डॉ. बाबासाहेबांनीही सर्वांना सोडायला लावली होती. परंपरागत जात व्यवसायाऐवजी शेती आणि पांढर पेशा व्यवसाय स्वीकारून मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा काबीज करायला सांगितल्या, त्या समाजाला आज तुमचा आणि बाबासाहेबांचा उपदेश आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे.
अण्णा तुम्ही हाडाचे कम्युनिस्ट असतानादेखील उत्तर आयुष्यात तुमची झालेली वाताहत, मुंबईच्या चिरानगर येथील झोपडीत झालेला मृत्यू आठवताना मन खूप विषण्ण होतं. बाबासाहेबांच्या क्रांतीलढ्याशी स्वतः ला जोडून घेतानाच
” जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव “
असं म्हणत जग बदलण्याचं बळ बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आहे हे तुम्ही ओळखलं होतं. ” मगराने माणिक गिळले, चोर बनले साव ” अशी तुमच्या साहित्याची प्रतिभा होती.
अण्णा तुमच्या जयंतीला काही लोक तुम्हाला पिवळ्या भंडाऱ्यात रंगवून सोईनुसार पुन्हा जातीच्या चौकटीत कैद करून जयंती पुरतं खोटं प्रेम दाखवून तुम्हाला स्टेटस, बॅनर आणि फोटोपुरतं मर्यादित ठेवतील. तुमचे विचार डोक्यात घेऊन त्यावर वाटचाल करण्याऐवजी तुमचे फोटो डोक्यावर घेऊन मिरवतील आणि मिरवत आहेत हे पाहून खूप वाईट वाटतं म्हणूनच आज हे पत्र लिहीत आहे.
अण्णा तुम्ही खरंतर, कोणत्याही शाळेत, विद्यापीठात न जाता अनेक शाळांमधून विद्यापीठातून अभ्यासाचा विषय बनलेले आहात. तुम्ही खरंच काळाच्याही पुढचे तपस्वी आणि बंडखोर साहित्यिक, कवी, लेखक, शाहीर आणि हाडाचे कार्यकर्ते होता. तुमचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येक तरुण – तरुणीने आपला उत्कर्ष घडवून आणावा हीच तुम्हाला आदरांजली आणि सलामी ठरेल हेच तुमच्या जयंतीदिनी मला वाटत आहे.
अण्णा तुम्ही खूप स्वाभिमानी होता. जे लोक स्वाभिमानी असतात ते कधीच कोणापुढेही लाचार होत नाहीत आणि जे लाचार होत नाहीत त्यांनाच हक्क आहे तुम्हाला अभिवादन करण्याचा….
अण्णाभाऊ तुम्हाला विनम्र अभिवादन आणि सलाम