दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे : ज्यांची लायकी नाही अशा राजकारणांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो आहोत. त्याचबरोबर आपल्याला असं वाटतंय की ते जे नालायक राजकारणी आहेत ते आपल्या देशाचा विचार करतील. मात्र त्यांनी मागच्या काही वर्षांत जे काही करुन ठेवलं आहे. ते आपल्या समोर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक आणि आगरकर ज्या पद्धतीने देशाचा विचार करायचे तसं आता होताना दिसत नाही असं म्हणत सध्याचे राजकारण आणि राजकारणी यांच्यावर सुबोध भावे यांनी टीका केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सुबोध भावे यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावलं होतं . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
