
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
जिथं मन स्वयंप्रेरित होऊन निरंतर प्रगतिशील विचार आणि कृतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतं अशा स्वातंत्र्याच्या नंदनवनात माझा देश जागृत होऊ दे असं म्हणणाऱ्या व पुरुषी वर्चस्व असलेल्या पोलीस खात्या त मुलींना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या 1981 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची 14 ते 25 वयोगटातील तरुण तरुणींना मार्गदर्शन करणारे, त्यांच्या आयुष्याला, करिअरला आणि नेतृत्व गुणाला योग्य दिशा देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतीचे महत्त्वपूर्ण असे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याची पानं होय असे मत मीनाक्षी काळे पाटील यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात आयोजित व डॉ. प्रमिला तलवाडकर,जीएसटी निरीक्षक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 270 व्या वाचक संवाद मध्ये प्रसिद्ध साहित्यिका,पत्रकार तथा प्रा. मीनाक्षी काळे पाटील यांनी मीरा बोरवणकर स्वलिखित माझ्या आयुष्याची पानं या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की आपण सकारात्मक विचारांच्या मित्रांमध्ये वावरत राहिले पाहिजे कारण ते प्रगतीकडे नेतात. चांगल्या मार्गदर्शनाचे सदैव स्वागत करा.आपलं मन मोकळं ठेवलं की शिकायला अडचणी येणार नाहीत. जग खूप सुंदर आहे .आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोड मेहनत करा. सदैव चालत रहा, हसत रहा, वाचत रहा, गात रहा, करत रहा म्हणजे यश तुमचेच असेल. शूर म्हणजे काही सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त शूर नसतो तर तो त्याचे शौर्य सर्वसामान्य माणसापेक्षा पाच मिनिटे जास्त काळ टिकवून ठेवतो. भीती आणि आत्मविश्वास या दोघांमध्ये पाच मिनिटांचे अंतर असते. आपले स्वप्न साकार होताना बघणाऱ्या आणि समृद्ध जीवन व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीने वाचले पाहिजे असे हे मुक्त विचारांचं पुंजक असलेले पुस्तक आहे असे त्या म्हणाल्या.
शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रमिला तलवाडकर म्हणाल्या की सर्वोत्तम करायला लावणारी साहित्यकृती म्हणजे माझ्या आयुष्याची पानं होय. वाचन वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अश्या या वाचक संवाद उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचलन संगीता सोनाळे यांनी तर आभार आनंद बिरादार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, प्रा.राजपाल पाटील, हनुमंत म्हेत्रे, राजेंद्र एकबेकर आदींनी परिश्रम घेतले.