
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : गुंतवणूकदार, सामान्य ग्राहक तसेच कर्ज काढणाऱ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून पुढील दोन दिवस भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढावा बैठक होत आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडून पाच ऑगस्ट रोजी नवीन पतधोरण जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, या बैठकीत रेपो रेट, व्याजदर, आरबीआयकडून अन्य बँकावर लागू होणार नियम आदीवर चर्चा व निर्णय होणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती देतील. तसेच आगामी काळात आरबीआय आणखी व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या वर्षी जूनमध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात पन्नास बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना, लॉकडाऊन, महागाई, बेरोजगारी यामुळं आधी सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, त्यामुळं आरबीआयनं व्याजदरात वाढ केली नव्हती. मात्र आजच्या बैठकीतून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात थोडीफार वाढ केली आहे. पण भारतात आरबीआयने व्याज दरात फारशी वाढ केली नाही. यामुळं द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीतून कोणता निर्णय येतो याची उत्सुकता लागली आहे.