
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने अटक केलीय. या अटकेच्या कारवाईचे पडसाद देशभरात उमटले असतानाच ईडीने मात्र कारवायांचा धडाका सुरुच ठेवला आहे.
येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात पुण्यातील व्यावयासिक अविनाश भोसले व बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्यावरही ईडीने कारवाई केलीय. दरम्यान, याप्रकरणाशी संबंधीत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने एकूण ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ही मालमत्ता अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांच्याशी संबंधीत असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसले यांच्याशी संबंधित १६४ कोटी रुपयांच्या तर छाब्रिया यांच्याशी संबंधीत २५१ कोटीं रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १८२७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. संजय छाब्रिया यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. यामध्ये सांताक्रुझ येथील ११६ कोटी ५० लाख रुपयांचा भूखंड, बंगळूरू येथील जमीनीतील छाब्रिया यांच्या कंपनीचे २५ टक्के समभाग (११५ कोटी रुपये), सांताक्रुझ येथील तीन कोटी रुपये किमतीची सदनिका, दिल्ली विमानतळावरील छाब्रिया यांच्या हॉटेलमधून मिळालेला १३ कोटी ६७ लाखांचा नफा, तीन कोटी १० लाख रुपये किमतीच्या तीन महागड्या गाड्या यांचा समावेश आहे.
याशिवाय भोसले यांची मुंबईतील १०२ कोटी ८० लाख रुपये किमतीची दुमजली सदनिका, पुण्यातील १४ कोटी ६५ लाख रुपयांचा भूखंड, पुण्यातील आणखी एक २९ कोटी २४ लाखांचा भूखंड, नागपूर येथील १५ कोटी ५२ लाख किमतीच भूखंड, तसेच नागपूरमधील एक कोटी ४५ लाखांचा भूखंड अशा मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे.