दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
गळेगाव, वझरगा तुपशेळगाव येथील शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामासाठी मन्याड नदी पत्रातून करावे लागते प्रवास
खानापुर: देगलुर तालुका व बिलोलि तालुका सीमेवरून वाहणाऱ्या मन्याड नदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेगाव येथील शेतकऱ्यांची शेत जमीन आहे . त्या शेतकऱ्यांना शेती कामे करण्यासाठी मन्याड नदीच्या पत्रातून जीव मुठीत धरून ये जा करावे लागत असल्याने या ठिकाणी शासनाने धरण बांधकाम करावे अशी शासनाकडे शेतकरी मागणी करीत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, लोहा, कंधार, मुखेड तालुक्यातून वाहत येणारी मन्याड नदी ही बिलोली व देगलूर तालुक्याच्या सीमेवरून वाहत जाऊन पुढे तेलंगणा राज्यास मिळते .पण ही नदी जेंव्हा बिलोली तालुक्यातील गळेगाव शिवारात व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेगाव शिवरातून वाहते तेंव्हा बिलोली तालुक्यातील गळेगाव येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही मन्याड नदी पलीकडे देगलूर तालुक्यातील वझरगा व तुपशेगाव शिवरालगत आहे. त्याच प्रमाणे देगलूर तालुक्यातील वझरगा व तुपशेगाव येथील शेतकऱ्यांची बरीचशी शेतजमीन ही बिलोली तालुक्यातील गळेगाव शिवारात असल्याने दोन्ही शिवाराच्या मध्ये मन्याड नदी पात्र असल्याने शेतकऱ्यांना त्या मन्याड नदीपात्रातुन शेत काम करण्यासाठी जीवमुठीत धरून पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अचानक पणे वाढल्यास शेतकऱ्यांना आपला जीव ही गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी शासनाने धरण बांधकाम करून शेतकऱ्यांना रहदारी साठी रस्ता तयार करून द्यावे अशी शेतकऱ्यांतुन शासनाकडे मागणी केली जात आहे.
