दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी.
ता.४/ऑगस्ट
आदमपूर: बिलोली तालुक्यातील रामतीर्थ जिल्हा परिषद गट हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव सुटले आहे.त्याअनुषंगाने सर्वच ओबीसी समाजाचे राजकीय पुढारी हे परिसरातील नागरिकांची गाठी भेटी घेण्यात भर देत आहेत. अशातच आदमपूर येथील माजी सरपंच अरविंद पेंटे आदमपूरकर हे देखील आपली भूमिका मांडताना जर भारतीय जनता पक्षाने रामतीर्थ जिल्हा परिषद गटाचे तिकीट दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाषराव साबणे यांचे खंदे समर्थक व विश्वासू असलेले आदमपूर येथील माजी सरपंच अरविंद बालासाहेब पेंटे हे देखील भारतीय जनता पक्षात मागील झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकी पासून स्वतःला झोकून देऊन पक्षासाठी दिवसरात्र काम करीत आहेत. व योगायोगाने रामतीर्थ जिल्हा परिषद गट ओबीसी सर्वसाधारण सुटले असल्याने सर्व सामान्य नागरिकांना मदत करणारा, अनेकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा व आपल्या धनगर समाजाच्या समाज चळवळीत स्वतःला झोकून देणारा असा संपूर्ण बिलोली तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात परिचय असणारे अरविंद पेंटे हे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत रामतीर्थ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या इच्छेला पक्षांनी कांहीही निर्णय देवो, पण सद्यातरी रामतीर्थ जिल्हा परिषद गटात ओबीसी प्रवर्गातून अरविंद पेंटे यांच्या नावाची रामतीर्थ जि. प. मतदार संघात जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. लोकांच्या मनातील भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला तर त्याचा नक्कीच फायदा हा पक्षाला होईल असे हे परिसरातुन बोलले जात आहे.
