
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- पालघर जिल्ह्यातील जव्हार,वाडा,मोखाडा आणि विक्रमगड या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पाच लाख झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या पाच लाख वृक्ष लागवड ही जिल्हा परिषद यंत्रणा पालघर आणि टाटा मोटर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने एक सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी म्हणून जनहितार्थ पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जव्हार तालुक्यातील कोगदा आणि जूनीजव्हार येथून ४ ऑगस्ट पासून सूरवात करण्यात आली.
लागवड करण्यात येणारी झाडे ही पडीक जमिनींवर लावण्यात येणार असून या झाडांमध्ये आंबा,काजू,पेरू अशी फळ झाडे तर साग व बांबू ही भविष्यात शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनात मदत करणाऱ्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
या वृक्ष लागवडी प्रसंगी जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर,पं.स.विस्तार अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,मनरेगा विभागाचे तांत्रिक अधिकारी प्रतीक पाटील,रवी माळी,तौफिक शेख,वाडा व विक्रमगडचे ग्रामीण विकास विभागाचे संचालक तुषार माळी,टाटा मोटर्सचे शैलेश महुलीकर,सोमनाथ सोनवणे,बायफ संस्थेचे प्रतिनिधी तसेच स्थानिक प्रशासकीय कर्मचारी व रोजगार सेवक उपस्थित होते.