
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी
भूम:- शहरातील बौद्ध समाजाच्या स्मशान भूमीसाठी शासनाची जागा वर्ग करा या मागणीसाठी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून धरणे व मोर्चा तसेच आमरण उपोषण करण्यात आले होते. भारत देश स्वतंत्र होऊनही भुम शहरात साधी स्मशान भूमी नाही. आजही दलित समाजाला उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे. या संदर्भात ऑल इंडिया पँथर सेनेने चार दिवस आमरण उपोषण केले होते. त्यानंतर नगरपरिषदेने लेखी स्वरूपात पत्र देऊन 2 महिन्यात नोंद करुन देतो असे आश्वासन दिले होते. पण दोन वर्ष उलटूनही नोंद केली नाही.
याबाबत विचारणा केल्यास सदरील जमीन ही 221 सर्व्हे नंबर मधील त्यावर महाराष्ट्र शासन असे नांव आहे त्यामुळे ही जमीन देण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यानंतर या जागेची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात आली त्यात 0.46 आर जमीन बौद्ध स्म्शानभूमीची असल्याचा नकाशा दिला आहे. हा प्रस्ताव सद्या जिल्हाधिकारी कार्यालयात असून त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. वारंवार निवेदने देऊनही शासन दखल घेत नाही त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड हे 13/ 8/22 रोजी बौद्ध स्मशानभूमीत चितेवर बसून आमरण उपोषण करणार आहेत.