
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
———————
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवला होता. हे प्रकरण आता ईडीकडे दाखल केल्याची माहिती भाजपा नेते समीर दुधगांवकर यांनी दिली आहे. या प्रकरणी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी बॅंकेच्या विरोधात जालना येथील औद्यौगिक न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. औद्योगिक न्यायालयाने १ मार्च २०१६ रोजी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला तरीही बॅंकेने गोठवलेले पैसै कर्मचाऱ्यांना परत न देता हे प्रकरण रिट याचिकेद्वारे औरंगाबाद येथील खंडपीठात दाखल केले. सदर प्रकरणाची पडताळणी करुन खंडपीठाने बॅंकेची ही कृती बेकायदेशीर असल्याचे ठरवत औद्योगिक न्यायालयाचाच निकाल कायम ठेवला व गोठवलेल्या रकमा कर्मचाऱ्यांना ६ टक्के व्याजासह परत देण्याचे निर्देश सन २०२१ मध्ये दिले तरीही बॅंकेने त्या रकमा अद्याप परत दिल्या नाहीत अशी माहिती देत समीर दुधगांवकर यांनी हे प्रकरण आता ईडीकडे दाखल केल्याचे सांगितले.
बॅंकेने सदरच्या रकमा बेकायदेशीरपणे जमा करण्याचा ठराव दि. २८ फेब्रुवारी २००० रोजी पारित केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण आता ईडीकडे दाखल करण्यात आले आहे. ॲड. बारहाते यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले असून या प्रकरणी लवकरच केंद्रीय सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमीत शहा यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती परभणीतील भाजपा नेते समीर दुधगांवकर आणि स्वराज इंडिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गीरी यांनी दिली आहे.