दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
—-O—-O—-O—-
परभणी : वसमत रोडवरील औद्योगिक वसाहतीपासून कांही अंतरावर वसलेल्या अहिल्याबाई होळकर नगरातील रस्ता दुरुस्तीचे काम आजपासून जोमाने सुरु करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात खडीकरण सुरु करुन नागरिकांना दिलासा देण्याचे काम महापालिका करीत असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. या रस्ता दुरुस्तीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन छेडले होते तर त्या आंदोलनाचे आंखो देखा हाल चित्रीत करुन वृत्तांकनाची धारही चालू वार्ता या दैनिकाने अधिक तीव्र केली होती. लोकशाही मार्गाने सुरू केलेले आंदोलन आणि भारतीय राज्य घटनेच्या चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे अपेक्षेने बघितले जाते त्या वृत्तपत्रातील बुलंद वृत्तांकनाचा समन्वय योग्य वेळी साधून आल्यामुळे तो प्रशासनाच्या पूरता वर्मी लागला जाणे स्वाभाविक होते किंबहुना त्याचाच परिपाक म्हणून महापालिकेला सदर रस्ता दुरुस्तीचे काम त्वरीत हाती घेणे भाग पडले असावे यात शंकाच नाही.
सुमारे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही वसाहत. सर्व प्रकारचे कर मनपा व शासन स्तरावरील अन्य कार्यालयांना इमाने इतबारे अदा करणारे इथले नागरिक, कोणत्याही नागरी सुविधांचा पुरवठा नसतानाही गुण्या गोविंदाने वास्तव्य करीत आले आहेत. वर्षानुवर्षे नागरी सुविधांची प्रतिक्षा केली परंतु धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरणारे मनपा प्रशासन झोपेचं सोंग घेऊन भोळ्या भाबड्या नागरिकांची अधिकच प्रतारणा करीत असल्याचे दिसून येत राहिले. एका बाजूला ढिम्म प्रशासन तर दुसरीकडे एकदा का मतांची झोळी भरली की, पाच वर्षे कधीही ढुंकूनही न बघणारे नेत्यांचं स्वार्थी राजकारण. परिणामी भरडला जाणा-या करदात्या नागरिकांना अखेर रस्त्यावर उतरणेच भाग पडले.
चांगले रस्ते, दोन्ही बाजूंनी वहाणा-या सांडपाण्याचा निचरा करु शकणारी व नैसर्गिक पाणी वाहून जाऊ शकणार अशा नाल्या व गटारे, रस्त्यांवरुन वाहनांच्या वर्दळीत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी योग्य अशी फूटपाथ व्यवस्था, कधीही खंडीत न होणारी दिवा-बत्तीची सोय, पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ, मुबलक व नियमित पुरवठा, सुलभ शौचालये व स्वच्छता गृहे, वाचनालये, समाज मंदीरे, शैक्षणिक व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र यांसारख्या नागरी सुविधा हक्काने मिळणे क्रमप्राप्त असूनही त्या जाणीवपूर्वक पुरविल्या जात नाहीत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत ही करदात्या नागरिकांना अशा सुविधा पुरविल्या जात नाहीत यापेक्षा दुर्दैव ते कोणते म.हणायचे ? स्वतंत्र देशातील भारतीय नागरिकांची ही कुचंबना, विडंबना आणखी किती दिवस चालणार आहे, हा खरा सवाल असून निवडणुकीच्या वेळी मोठमोठी भाषणे ठोकायची, आश्वासने द्यायची, ववेगवेगळी अमिषे दाखवायची, निरनिराळ्या भूलथापा द्यायच्या अन् एकदा का निवडून आले की, पाच वर्षे गायब व्हायचे. हा अनुभव परभणीकरांसाठी नवा नाहीय. नागरिकांनीही आपला स्वाभिमान बाळगून कोणाच्याही अमिषाला बळी न पडता मतांच्या बाजार करु नये. तर आणि तरच आपला हक्क, स्वातंत्र्य अबाधित राहू शकेल. त्यासाठी व्यापक लढा उभारुन, प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावून हक्काच्या नागरी सुविधा प्राप्त करु शकतो एवढे नक्की !
