दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापले. अधिकाऱ्यांनी फक्त येस सर म्हणायचे आणि आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची असे विधान गडकरी यांनी केले आहे.
ते नागपूरमध्ये बोलत होते.
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेनं आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम हा प्रकल्प सुरू केलाय. त्याचं उद्घाटन काल नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, ‘मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त ‘येस सर’ म्हणायचे आणि आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची हे लक्षात ठेवा. आम्ही म्हणू तसे सरकार चालेल.’ यावेळी गडकरींनी युती सरकार काळातील एक किस्साही सांगितला.
मी महाराष्ट्रात 1995 मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसे करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे दोन हजार मुलांचा मृत्यू झाला. तेथील 450 गावांना रस्ते नव्हते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितले, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला. या भागात अनेक लोक मागासलेली होती. त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला, असे गडकरी म्हणाले.
