दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या शेतीचे खूप मोठे नुकसान झाले. विशेषतः या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. येवढे नुकसान होऊनही सरकारकडून फक्त घोषणाबाजीच चालू आहे. प्रत्यक्ष मदतीचा शासकीय आदेश काही निघत नाही. म्हणून अस्वस्थ शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांची भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाढा वाचला व मागण्यांचे निवेदन दिले.
नांदेड जिल्ह्यातील जवळपास ४ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत असून नुकसानीचे प्रमाण ६० टक्के एवढे आहे. म्हणून शासनाने २०१९ ला सांगली – कोल्हापूरला दिलेल्या मदतीच्या धर्तीवर हेक्टरी ४० हजाराची मदत द्यावी, पीकांच्या नुकसानीचे अंदाज पाहता पीकविमा करारातील तरतूदीप्रमाणे २५ वा ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या महसूल मंडळातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा परताव्याच्या २५महसूल मंडळातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा परताव्याच्या २५ टक्के रक्कम तात्काळ अदा करण्याचे विमा कंपनीला आदेश द्यावेत, सद्याचे झालेले पंचनामे हे काही भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून ३१ जुलैपर्यंतच्या नुकसानीचे अहवाल आहे पण ऑगस्टच्या दोन आठवड्यातही खूप मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान झाले त्याची नोंद व्हावी, पी. एम. किसान सन्मान योजनेतील त्रुटी दूर या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावे, जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त पदांची तात्काळ भरती करून कामाला गती द्यावी या व इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. नांदेडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये भयाण असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांबाबत शासनाने तात्काळ परिपत्रक काढून मदत द्यावी अन्यथा या असंतोषाचा रस्त्यावर उद्रेक होईल असा धमकीवजा इशारा कैलास येसगे यांनी निवेदनात दिले आहे.
