दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
जगात अनेक प्रकारची शासन व्यवस्था दिसून येते. कोठे हुकमशाही आहे. कोठे झुंडशाही आहे. कोठे महाजनशाही आहे. तर कोठे लोकशाही आहे. लोकशाहीत अध्यक्षीय शासन प्रणाली व संसदिय शासन प्रणाली असे दोन प्रकार दिसून येतात. जगात लोकशाही शासन प्रणाली ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. येथे सर्व गोष्टी घटनेनुसार चालतात. इंग्लंडला लोकशाहीची जननी समजले जाते. येथील लोकशाहीही घटनेनुसार चालते; पण इंग्लंडची राज्यघटना लिखीत स्वरुपात नाही. फार कमी कायदे हे लिखीत स्वरुपात आहेत.
भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. येथील शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेनुसार चालते. आपली राज्यघटना सर्वात मोठी लिखीत राज्य घटना आहे. येथे घटनेने सांगितलेल्या कायद्याप्रमाणे शासन चालते. भारतीय घटनने भारतीयांना मुलभूत हक्क दिलेले आहेत तसेच राष्ट्रासाठी, समाजासाठी व स्वतःचा भल्यासाठी कोणती कर्तव्ये करावीत हे ही सांगितलेले आहे. आपणाला केवळ हक्कच नाही तर कर्तव्ये सुद्धा पार पाडावी लागतात. येथे सर्व हक्कांसाठी भांडतोत व कर्तव्य करण्यास दूर्लक्ष करतोत.
भारतात लोकशाही आहे. ती घटने प्रमाणे चालते. चालवावी लागते हे आपण विसरत तर नाही ना असा प्रश्न सध्या सामान्य नागरिकांना पडत आहे. लोकशाही पद्धत आपल्यापासून दूर जात आहे का? हा ही प्रश्न सतावतो आहे. याचं कारण देशात विरोधी पक्षच राहीला नाही असे वाटते. लोकशाहीत विरोधी पक्षाला व दबाव गटाला अतिशय महत्व असते. देशात विरोधी पक्षाला फक्त सरकारच्या धोरणावर टिका करणे एवढचं काम नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्था व लोकशाही समाज हा विरोधी पक्षाच्या सुदृढपणावर अवलंबून असतो. विरोधी पक्ष जितका मजबूत तितकी लोकशाही मजबूत बनत जाते.
लोकशाहीत जेवढा विरोधी पक्ष मजबूत तेवढा सामान्य जनतेचा विकास म्हणजे देशाचा विकास होऊ शकतो. विरोधी पक्ष मजबूत झाला तर सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांना चुकीचे निर्णय बदलायला लावतो व देशहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडतो. फक्त विधायक कामासाठीच सत्तेचा वापर झालं पाहिजे यासाठी सताधाऱ्यांवर अंकुश ठेवतो. सक्षम लोकशाहीसाठी, लोकाभिमुख कार्यासाठी विरोधी पक्षाला व विरोधी नेत्याला लोकशाहीत महत्वाचे स्थान असते. उपेक्षिताचे दुःख दुरकरण्यासाठी, सरकारच्या त्रुटी दाखविण्यासाठी लोकशालीत विरोधी पक्ष मजबूत हवाच व असायलाच पाहिजेत.
खरे तर विरोधीपक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे. सरकारच्या धोरणावर, व ते धोरण योग्यपणे राबविण्यासाठी विरोधी पक्ष सरकारवर अंकुश ठेवतो. विधायक काम करण्यासाठी सरकारवर दबाब आणण्याचे कार्य विरोधी पक्ष करत असतो. इंग्लंडमध्ये तर विरोधी पक्षांचा नेता म्हणजे सॅडो प्रायमीनिस्टर असतो. विरोधी पक्षाचं स्वतंत्र सॅडो कॅबीनेट असते. सत्ताधारी सत्ता चालवण्यास असमर्थ ठरले तर विरोधी पक्ष सत्ता हातात घेण्यास सक्षम असतो व असावे लागते.
भारतात सत्ताधारी विरोधकाला संपवायला निघालेत का? सत्ताधारी पक्षांचा कोणी तरी एक मोठा नेता आता देशात विरोधी पक्ष संपल्यात जमा आहे व उरले सुरले विरोधी पक्षांना संपवून टाकू असे विधान केलाचे वर्तमान पत्रात वाचण्यात आले. खरं तर लोकशाही राज्यात हे विधान योग्य वाटत नाही. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष मजबूत असलंचं पाहिजे. लाकशाहीत विरोधी पक्षाला जीवंत ठेवायलाच पाहिजे. एक पक्षीय सरकार म्हणजे सरळ सरळ हुकूमशाहीच झाली.
लोकशाहीत दबाव गटालाही खूप महत्व असते. आपल्याकडे शेतकरी संघटना, विविध शिक्षक संघटना, विविध कामगार संघटना हे दबाव गटाचं काम करताना दिसतात. लोकशाहीत दबाव गट आपल्या गटातील सदस्यांचे हितसबंध जोपसण्यासाठी काम करत असते. त्यांच्या सदस्यांच्या हितासाठी झटत असते. सरकारवर दबाव आणत असते; पण आजकालचे दबाव गटही कोणत्यातरी पक्ष्याच्या दावणीला बांधले गेले आहेत. तर काही राजकीय पक्षाच्या आश्रयाला जात आहेत.
सध्याचं राजकारण कोणत्या थराला गेलं आपण सर्वचजण पहात आहोत. आगोदरचे सरकार तिन चाकी होते. पण रिक्षात आजचे सरकार चालवणारेच जवळपास आजचे निम्मे मंत्री बसले होते. आडीच वर्ष शिवसेना व पुढील आडीच वर्ष पुन्हा शिवसेनाच (राजकीय सोय म्हणून शिंदे गट) सत्तेत राहवं असं त्याचं ठरलं होतं की काय असं सामन्य मतदारांना प्रश्न पडलेला आहे. खरं खोटं त्या राजकारण करणाऱ्यालाच माहित असावे.
आपण नेहमी बोलतोय महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वात प्रगत राज्य. ही शिवरायांची भूमी, ही छ.शाहु मा. फुले, महामानव डॉ.आंबेडकर यांची भूमी. ही अनेक क्रांतीकारक, अनेक समाजसुधारकांची भूमी. महाराष्ट्र एक सुसंस्कारीत राज्य, मग आशा पवित्र भूमित येवढं गोंधळी राजकारण चालते? महाराष्ट्राच बिहार का होतोय? येथील सभ्यपणा कोठे गेला? या सर्व राजकारण्यांनी सभ्यपणा सोडला का? खोक्या पुढे सर्वांचे डोके रिकामे झाले का? विधानभवन हे लोकशाहीचं मंदिर.मंदिरात जाताना सामान्य लोक , पूजारी हे मंदिराच्या पायरीचं दर्शन घेतात.
आपले आमदार, मंत्री हे तेथील पुजारी आहेत. मंदिराची गरिमा ते का ठेवत नसावेत? तसेच इतर राजकारणी मग ते विरोधक असो की सत्ताधारी हे सर्व ढोंगी राजकारणी आहेत. मंदिराच्या पायरीवर तमाशा मांडतात. पन्नास खोके सगळं ओकेच्या घोषणा देतात. मग सत्ताधारी ही त्याच प्रकारच्या विरोधी घोषणा देतात. यात सत्ताधारी कोण व विरोधक कोण हे ही कळत नाही. सगळे एकाच माळेचे मणी.
वरील घोषणेवरून सामन्य मतदारांना कळालं की सत्ताधारी व विरोधक दोघंही एकच आहेत. व्यापारी जसं शेतकऱ्यांना लुबडतात तसा प्रकार या पक्ष्यांचा आहे. सांकेतिक भाषा ही फसवण्यासाठी लुबाडण्यासाठीच जास्त वापरली जाते असे दिसून येते.
ग्रामीण भागात खोका म्हणजे काय असं विचारलं तर तो सरळ सांगेल. एखादी तुटकी लाकडी/पत्र्याची पेटी किंवा काही सामान विकत आणलेली रिकामी कागदी कपट्याचे डब्बे किंवा दारुची शिसी ठेवलेली एखादी लहानशी पेटी. हे खोकं कुठतरी आडवळणीला टाकलेली बिनकामी वस्तू. पण हेच खोके सत्ताधारी व विरोधकांना किती महत्वाचे आहे हे त्यांच्या घोषणेवरून संपूर्ण देशाला व महाराष्ट्राला कळालेलं आहे.
दिल्लीतही विस खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. टाकावू वस्तू याला आम्ही खोका म्हणतोय. या शिवाय आम्हा ग्रामीण माणसांना खोका माहित नाही.
मुंबई, दिल्लीच्या भाषेत खोक्या्ला काही तरी विशेष महत्व दिसते. खोका ही सांकेतिक भाषा असेल. आशी सांकेतिक भाषा कोण वापरतं हे ग्रामीण लोकांना पटवून सांगायची आता गरज पडणार नाही. कारण ग्रामीण लोक आशा सांकेतिक गोष्टीला शेतीमाल विकताना किंवा कोणातरी चोर ठगांकडून ते फसवले गेलेले असताना ते अनुभवलेले असातात.
पन्नास खोके व सगळचं ओके झालं. यावरून हामरीतुमरी झाली. परंतू तुमच्या या ओकेत तुम्ही महाराष्ट्राला विसरुन गेलात. महाराष्ट्राची संस्कृती विसरत चाललात. महाराष्ट्रात शेतकरी अतिवृष्टीमुळे जर्जर झालेला आहे. शेतातलं उभं पीक वाहून जाताना, जादा पाण्यामुळे वाळून जाताना शेतकऱ्याचं काळीज टराटरा फाटून जात होतं. डोळ्यातून आश्रू वाहात होते. त्यासाठी तुम्ही नेत्याच्या भाषेत जे सांगायचं ते तुम्ही सांगितलात. मदत मिळेल; पण कोणाला? सरसकट की काही लोकांना हे कळण्यास मार्ग नाही.
निसर्ग कधीच भेदभाव करत नाही. तो तर सर्वांना समान वागणूक देतो. तो कधीच पन्नास खोके व सगळं ओके असं म्हणत नाही. ज्या भागात, जिल्हयात पाऊस पडला तो पाऊस सर्वच शेतकऱ्यांच्या शेतावर पडलेलं आहे. सारखंच पडलेलं आहे. नुकसान सर्वांचंच झालेलं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना खोक्याच्या ओकेची गरज नाही. खोके घेऊन ओके तुम्ही व्हा; पण शेतकर्यांना मदत करून शेतकऱ्यांना ओके म्हणावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सामन्य मतदारांना सत्ताधारी व विरोधक सारखेच असतात. त्यांना कामाशी, विकास होण्याची अपेक्षा असते.
एवढं मात्र खरं की विधान भवन पायऱ्यावरील घोषणेने सर्वचं राजकारणी सारखेच असतात असं ग्रामीण भागात कुजबूज मात्र चालू आहे…
©राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी, नांदेड-६
९९२२६५२४०७.
