
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ई-बसची “बॅटरी लो’ होण्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. बॅटरी संपल्यामुळे बस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ताफ्या मध्ये दाखल झालेल्या काही ई-बसच्या बॅटरी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) येथे तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात सध्या पीएमपीच्या ३१२ ई-बस मार्गावर आहेत. तर, १३० बस अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत निगडी डेपोमध्ये उभ्या आहेत. पुण्यात २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस ई-बस दाखल झाल्या. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने ३०० बस दाखल झाल्या. प्रामुख्याने लांब पल्याच्या मार्गावर या ई-बस चालतात. या ई-बसच्या बॅटरीची चार्जिंग टीकत नाही असे समोर आल्या मुळे मार्गावरील फेऱ्या रद्द करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बस चार्जिंग करून पुन्हा मार्गावर धावण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास लागतात. पीएमपीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार या बस धावत नाहीत. त्यामुळे प्रवासी जाम वैतागले आहेत.