दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, प्रकल्प प्रमुख शुभांगी रासने उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते.
