
दैनिक चालु वार्ता मोताळा प्रतिनिधी :-
तालुक्यातील तळणी येथील राहीवासी असलेले राजेंद्र बोंडे सर यांना नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सन २०२२ हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान झाला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात गंगापूर बु. या गावात गेली ३० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. सध्या श्री.हनुमान विद्यालय गंगापूर बु. या विद्यालयात मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. गणितासारखा अवघड विषय जास्त अभ्यास करून सुद्धा विद्यार्थ्यांना आवड निर्माण कशी होईल यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असतात. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सर परिचित आहेत. सरांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले. शाळेच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले, उपक्रम राबविले. शाळेचा परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला आहे. त्यासाठी शाळेला 2001 यावर्षी महाराष्ट्र राज्याचा वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विद्यालयाच्या व विद्यार्थ्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने 2018 यावर्षी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सरांना मिळालेला आहे. यावर्षी 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार भोर तालुक्याचे आमदार मा.संग्रामदादा थोपटे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला .आपले शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी संस्था व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानेच आपण हे काम करू शकलो व यापुढेही असेच काम करत राहणार अशी भावना सरांची आहे.