
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या आणि माळेगाव येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. यानिमित्तानं आयोजित शेतकरी मेळाव्यात कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
येत्या काळात ऊस तोडणी व वाहतूक नियोजन योग्य पद्धतीनं करण्याच्या सुचना यावेळी केल्या. साखर उद्योगातील अडचणींबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं योग्य धोरण आखणं आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून शेतकऱ्यांचं हित जोपासत राहू अशी ग्वाही यावेळी दिली. उत्तर प्रदेशचे हित डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार साखर निर्यातीचा कोटा कारखान्यांना निश्चित करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे. सोमेश्वरची गाळप क्षमता ८५०० टन प्रतिदिन इतकी होणार असल्यानं ३६ मेगावॅटपर्यंत सहवीज निर्मिती प्रकल्पाची विस्तारवाढ गरजेची आहे.
बारामतीत सोमेश्वरपेक्षा माळेगावची रिकव्हरी थोडीशी अधिक आहे. माळेगावनं गेटकेन व सभासदांना वेगवेगळा दर दिला. सोमेश्वरनं एकसारखा दर दिला. रिकव्हरीत सुधारणा होण्यासाठी नोंदीनुसारच ऊस गाळपाला आणावा. त्यात वशिलेबाजी नसली पाहिजे, अशी अपेक्षा मेळाव्यात व्यक्त केली. स्थानिक बाजारपेठ व निर्यातीवरच राज्यातील कारखान्यांना अवलंबून रहावं लागत आहे. निर्यात कोट्याची बंधनं केंद्रानं लादू नयेत. एकेकाळी जगात साखरेच्या बाबतीत ब्राझिलची मक्तेदारी होती. भारतानं ती मोडली. राज्याचा निर्यातीचा वाटा मोठा आहे. पण बदलत्या काळात इथेनॉल उत्पादन अधिकचं वाढवावं लागेल.