
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी
ओतूर – काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा ओतूर येथे कार्यरत असणारे साहित्यिक रणजीत पवार यांची निवड झाली.
नुकत्याच सोलापूर येथे संपन्न झालेल्या 12 व्या राज्यस्तरीय काव्यमहोत्सवामध्ये प्रा.ए. डी. जोशी (संस्थापक अध्यक्ष,इंडियन मॉडेल स्कुल सोलापूर), राजेंद्र दासरी (केंद्र निर्देशक ,आकाशवाणी सोलापूर) ,जेष्ठ गझलकार मसूद पटेल ,जेष्ठ सल्लागार सीमा भांदर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके ,राज्यसचिव कालिदास चवडेकर,राज्यकोषाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी निवडपत्र देऊन सन्मान केला.
याआधी बबन धुमाळ पुणे जिल्हाध्यक्ष तर रणजित पवार हे पुणे जिल्हा सचिव म्हणून काम पाहत होते. रणजित पवार यांचे वेळोवेळी मंचाला लाभत असलेले योगदान याचा विचार करून ,त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेऊन त्यांची निवड झाल्याचे राज्यसदस्य संदीप वाघोले यांनी सांगितले.
रणजित पवार यांचे साहित्यिक योगदान महत्वपूर्ण आहे.त्यांची आजपर्यंत दीपस्तंभ (ललित लेखसंग्रह), ममता पहिलवान चरित्र तर गाडग्यातली अमृतवाणी, क्रांतीज्योतीला वंदू या आणि कृपासिंधु इत्यादी चरित्रात्मक प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित असून ओतूर सारख्या ग्रामीण भागात तीन काव्यमहोत्सव यशस्वी करून अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
संत गाडगे महाराज यांचे विचार आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांचे विचार साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवणे हा रणजित पवार यांचा प्रमुख उद्देश आहे. त्यांना साहित्यिक योगदानाबद्दल भूमिपुत्र शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार चाळकवाडी , समाजभूषण पुरस्कार मुंबई , काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार इत्यादी राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.साहित्यक्षेत्रासोबत उत्कृष्ट संयोजक म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिक व मित्र बांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.