
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : महापालिका व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात झाले असल्याने नागरिकांचे खस्ता हाल होत आहेत. प्रसंगी अनेकांच्या जीवावरही बेतले जात आहे. सदरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण
यांची जबाबदारी महापालिकेची आहे. तथापि हे रस्ते दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली गेल्याचे मागील अनेक महिन्यांपासून सांगितले जात आहे. असं असताना व नागरिकांच्या जीवावर बेतले जात असतानाही खड्ड्यांचे साम्राज्य बनले गेलेले हे रस्ते दुरुस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही.
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील रस्त्यांची सुध्दा कमालीची दूरावस्था झाली आहे. कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील कारेगावाकडे जाणारा एकमेव रस्ता परंतु तो सुध्दा असंख्य अशा खड्ड्यांच्या विळख्यात पूर्णपणे जखडला गेला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना अक्षरशः आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करणे भाग पडते. अगदी वसमत (हायवे) रस्त्यापासून ते कारेगावापर्यंतचा हा रस्ता जीवावर बेतला जाणारा असाच ठरला जात आहे. मागील अनेक कालावधीपासून हा रस्ता जीवघेणा ठरला जात असूनही जिल्हा परिषद प्रशासन मात्र पूर्णपणे दूर्लक्षित करतांना दिसत आहे. महापालिका व जि.प. प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच सदर रस्ता दुरुस्तीचे काम रेंगाळत पडले आहे. प्रशासनाच्या या अनास्थेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी कटाक्ष राखला जाणे आवश्यक असतांना ते असल्याचे कुठेही दिसत नाही. तसे असते तर आणि या भागातील नागरिकांप्रति कनवळा असता तर नक्कीच या रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यास प्रशासनाला भाग पाडले असते. जागोजागी पडलेल्या या खड्ड्यांमुळे अगदी सायकल स्वारांपासून ते चारचाकी वाहनधारकांना आणि पायी रहदारी करणाऱ्या प्रवासी नागरिकांना या दूरावस्थेची मोठी झळ सोसावी लागत आहे. ग्रामपंचायत असो वा पंचायत समिती, महापालिका असो वा जिल्हा परिषद, यांची प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळेच करदात्या नागरिकांना मात्र हक्क असूनही याचा त्रास सहन करावा लागतो एवढे नक्की !