
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा/परभणी-
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : येथील ज्येष्ठ पत्रकार तथा चालू वार्ता या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांना “राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार” प्रदान करुन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
मागील ५२ वर्षांच्या कार्यकाळात पत्रकारितेतून झालेली प्रदीर्घ सेवा जनसामान्यांच्या हिताची ठरली जावी म्हणून श्री कराळे यांनी कसोशीने प्रयत्न केले असल्याचे त्यांच्या या कृतीतून दिसून आले आहे. त्याचेच फलित म्हणून त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज समता राज्य स्तरीय पुरस्काराने सुध्दा यापूर्वी गौरविण्यात आले आहे.अनेक संस्था, मंडळे, राजकीय व नामवंत व्यक्ती यांच्यातर्फे दत्तात्रय कराळे यांना आतापर्यंत २३ लहान मोठे पुरस्कार मिळाले आहेत.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या श्री कराळे यांचा अनेक सामाजिक चळवळीसह आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता व कृतिशील संस्थांशी घनिष्ठ संबंध आहेत. मराठवाडा विधायक विकास संसद, श्रीप्रस्थ सिटीझन वेल्फेअर असोसिएशन, श्री वामन-गंगा प्रतिष्ठान, पालघर जिल्हा संपादक संस्था आदी आस्थापनांच्या अध्यक्षपदाची धुरा ते मागील अनेक वर्षांपासून जबाबदारीने पार पाडीत आहेत. वसई तालुका पत्रकार संघाचे चिटणीस म्हणून ही त्यांनी अनेक वर्षे कार्य केले आहे.
विविध संस्थांशी समाज सेवेची नाळ जोडले गेलेले श्री कराळे पत्रकारिता क्षेत्रातही सदैव कार्यरत असतात. वयाची सत्तरी अनुभवत असतांनाही ते तरुणाईला प्रेरक ठरली जावी अशी पत्रकारिता आपल्या हातून घडली जावी याचा कटाक्ष ते सदैव राखतात. पत्रकारिता व सामाजिक वसा मुंबई सारखाच परभणीतही कायम राखता यावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मागील दोन वर्षांपासून ते पूणे येथून प्रकाशित होणाऱ्या चालू वार्ता या मराठी दैनिकाच्या वृत्तांकनाची जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या ते परभणी जिल्हा उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हाभरात जाळे विणले जावे यासाठी परभणीतील तालुकानिहाय शहरी व ग्रामीण प्रतिनिधींच्या शोधात असलेले दत्तात्रय कराळे हे होतकरु व कष्टाळू, (ज्यांना पत्रकारितेबरोबरच राजकीय व भौगोलिक ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे) पत्रकारांच्या प्रतिक्षेत आहेत. परभणी शहरात पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक उभारले जावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पत्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करुन त्यांना नामांकित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करणे, पत्रकारांसोबत पोलीस, महसूल, मनपा, जि.प., न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करुन विजेत्यांना व अन्यजनांना पत्रकार संघातर्फे ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख रकमेचा पुरस्कार देवून त्यांचा यथोचित सन्मान करणे या व अशा विविध उपक्रमांना उत्तेजन दिले जावे अशी दत्तात्रय कराळे यांची मनोमन इच्छा आहे.