
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर–
काँग्रेसचे नेते मा. खा. राहूल गांधी हे भारत जोडो पदयात्रेनिमित्त विविध समाज घटकांशी संवाद साधत आहेत. शेतकरी, शेतमजूर व युवकांसोबत मागील सात आठ वर्षांपासून सातत्याने कार्य करत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी वझरगा ते शंकरनगर येथील पदयात्रेदरम्यान श्री. राहूलजी गांधी यांची भेट घेतली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खाजगी पीकविमा कंपनी ही शेतकरी व सरकारची करत असलेली लूट अन् त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम व बेरोजगार तरूणांच्या हाताला याच भागात काम (उद्योगधंदे) या विषयांवर चालत चालत संवाद साधला. तसेच याच विषयाला घेऊन बनवलेले पोष्टर व नांगराची छोटी प्रतिकृती राहूलजी गांधी यांना दिले. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भारत जोडो यात्रेचे प्रभारी नसीम खान हे सोबत उपस्थित होते. मा. राहूलजी गांधी यांनी या मुद्यांची दखल घेत लगेच संध्याकाळी भोपाळा येथे झालेल्या सभेत पीकविमा कंपनीचा घोटाळा व केंद्र सरकारचे याबाबतचे धोरण यावर घणाघाती टीका केली.
दुसऱ्या दिवसी नायगाव येथे जनआंदोलनाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळात (डेलिगेशन) ही शेतकरी व असंघटीत कामगारांच्या प्रश्नांवर कैलास येसगे यांना राहूलजी गांधी यांच्याशी संवाद साधता आले. यात प्रामुख्याने शेतीसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक असावे, पीकविम्याचे खाजगीकरण रोखून शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे अन् मराठवाड्यात शेती आधारित उद्योग उभारणीला चालना देऊन रोजगार निर्मितीला चालना देण्याची नितांत गरज असल्याची भूमिका मांडली. यावेळी राहूलजी गांधी यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, माजी मंत्री डी.पी. सावंत हे उपस्थित होते. कैलास येसगे सारख्या जमिनीवर सातत्याने काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देगलूर ते नांदेडच्या प्रवासात राहूल गांधी यांना दोन वेळा भेटून शेती व इतर महत्वपूर्ण प्रश्नांवर संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यांकडून कैलास येसगे यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले जात आहे.