दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा- सुरेश ज्ञा. दवणे..:
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे शिवारातील एका शेतात गांजाची झाडे लागवड केल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे व पोलीस निरीक्षक संजय देशमुख व कर्मचाऱ्यांनी प्रदीप थावरा राठोड यांच्या गट नंबर 367 मधील शेतात पाहणी केली असता लहान-मोठी 23 गांजाची झाडे साधारणतः पावणे पाच लाख रुपयाची झाडे जप्त करण्यात आली. ही गांजाची झाडे तुरीच्या उभ्या पिकात व कापसात लावलेली आढळून आली. या गांजाच्या झाडाचे वजन केले असता 31.160 किलोग्रॅम भरले. याप्रकरणी पंचा समक्ष पंचनामा करण्यात येऊन मंठा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 557/ 2022 कलम 20अ एनडीपीसी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस हेडकॉन्स्टेबल अण्णासाहेब लोखंडे, ढवळे, राजाळे, मेखले, सुभाष राठोड, मुंडे, गायके, दीपक आडे व कर्मचाऱ्यांनी केली.
