दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””
दि. २२/११/२२ रोजी सकाळी १०-१२ दरम्यान कीर्तनकार ह.भ.प.भागवताचार्य शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर यांचे || सूश्राव्य कीर्तन ||
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
सोम.दि२१/११/२२ रोजी रात्रभर
|| श्री लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम ||
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी/लोहा : तालुक्यातील मौजे अंतेश्वर येथे स्थापित पूजनीय श्री अनंत ऋषी महाराजांच्या अविरत सेवेत आपला देह चंदनासारखा झिजविलेले व भागवत सेवेतील पूर्ण जीवनाचे सार्थक आहे, असा आदर्श समस्त भाविक भक्तांच्या समोर ठेवलेले प. पू. सद्गुरू शंकर भारती महाराज यांचा २१ वा संजीवनी समाधी सोहळा नांदेड जिल्ह्यातील मौजे अंतेश्वर नगरी मध्ये मागील १५ नोव्हें. २२ पासून सुरु आहे. मंगळवार, दि.२२ नोव्हें.२२ रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे.
सद्गुरू शंकर भारती महाराजांनी आपले संपूर्ण जीवनच भागवत सेवेमध्ये व्यतीत केले. सदैव हसतमुख चेहरा, गोड वाणी, धार्मिक ग्रंथ व देवी-देवतांचे गाढे अभ्यासक, वैदीक औषधाचार्य जनमाणसांत अशी ओळख असलेले पूजनीय शंकर भारती महाराज स्वभावाने मिलनसार असेच होते. मूळचे आंध्र प्रदेशातील सद्गुरू शंकर भारती महाराज अगदी लहान वयातच अंतेश्वर मुक्कामी कायमचे वास्तव्यास आले होते. तेव्हापासून ते अगदी आयुष्याच्य अखेरीपर्यंत त्यांनी पूजनीय श्री अनंत ऋषींची अविरत सेवा केली.
कार्तिकी वद्य १३ (त्रयोदशी), शकेल १९२३, गुरुवार, दि.१३/१२/२००१ रोजी महाराजांनी आपला देह श्री ऋषी महाराजांच्या चरणी समाधी रुपाने अर्पण केला. त्याच औचित्यावर महाराजांचे स्मरणार्थ म्हणून त्यांच्या संजीवन समाधी स्थळी कार्तिक १३, मंगळवार, दि.२२/११/२०२२ रोजी सूश्राव्य कीर्तन व महाप्रसाद सोहळा संपन्न होत आहे. महाराजांचे स्नेही व अंतेश्वर नगरीचे ग्रामस्थ मंडळी यांच्या समन्वय सहकार्याने प्रतिवर्षी हा सोहळा साजरा केला जातो. सोहळ्याचे हे २१ वर्षे असून मागील १५ नोव्हेंपासून दिवसातून तीन वेळा महाप्रसाद व दुपारी २ ते ४ या दरम्यान दररोज श्री रामायण कथा या ग्रंथाचे सूश्राव्य वाचन पार पाडले जात आहे. या दरम्यान सकाळी अल्पोपहार, दुपार व संध्याकाळी भाविक भक्तांसाठी स्वादिष्ट अशा भोजनाचा आस्वाद ग्रामस्थांतर्फे प्रदान केला जात असतो.
सोमवार, दि. २१/११/२२ रोजी सायं. ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजे दरम्यान “श्री लक्ष्मण शक्ती ग्रंथाचे पारायण” पार पाडले जाणार आहे. त्यानंतर सामुहिक आरती संपन्न झाल्यानंतर महाराजांच्या प्रतिमेची भव्य अशी पालखी मिरवणूक धिंग्रा, पताका, भगवे झेंडे, ग्रंथ, घेऊन वाजंत्र्याच्या निनादात संपूर्ण गावातून काढली जाते. त्यात हजारो भाविक भक्तांबरोबर निरनिराळे वेष परिधान करुन खेळ, कवायतींचा सहभाग असतो. सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण होत असते. त्यानंतर मंदीर परिसरातच सकाळी १० ते १२ दरम्यान सोनमांजरी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.भागवताचार्य शंकर महाराज लोंढे यांचे सूश्राव्य कीर्तनाचा लाभ व त्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन संपन्न होणार आहे. या सोहळ्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भाविक भक्तांसाठी लोहा येथून सकाळी ७.३० ते संध्याकाळी ७.३० दरम्यान राज्य परिवहन सेवेची सोय करण्यात आली आहे.
