
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील रब्बी पिकासाठी पाणी अत्यंत आवश्यक असताना ऐन मोक्याच्या वेळी थकीत वीज बिलाचे कारण पुढे करुन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करीत असल्यामुळे पाण्यासाठी आसुसलेले रब्बी पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकन्यांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून अन्य वर्षांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक होत आहे. देगलूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८२० मि.मि. आहे; परंतु गेल्या तीन वर्षापासून तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात देगलूर तालुक्यात सरासरी ९५२.९ मि.मि. पाऊस झाला आहे. त्यात देगलूर मंडळ ९७२.३ मिलिमीटर, खानापूर मंडळ १११३.३ मिलिमीटर, मरखेल मंडळ ८६२.२ मिलिमीटर, माळेगाव मंडळ ११६९.३ मिलिमीटर, शहापूर मंडळ ९९३.९ मिलिमीटर, हाणेगाव मंडळ ६३९.१ मिलिमीटर, नरंगल बु. मंडळ ८७७.४ मिलिमीटर असा पाऊस झाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात देगलूर तालुक्यातील माळेगाव मंडळात सर्वाधिक ११६९.३ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वात कमी ६७९.१ मिलिमीटर पाऊस हणेगाव मंडळात झाला आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या आरंभी अतिवृष्टीने शेतातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात
नुकसान केले. मूग, उडीद पिकांचा नास झाल्यानंतर पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान केले. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना अंतर्गत मशागतीसाठी तब्बल एक महिना शेतात पाऊल टाकता आले नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आणि गवतच पिकांच्यावर गेले. शेतातील उरले- सुरले पीक काढून आणण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरी पोटी खूप मोठा खर्च करावा लागला. शेतातून सोयाबीनचे पीक घरी येताच बाजारातील सोयाबीनचे भाव घसरले. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, सोयाबीनचे घसरलेल दर, औषधी, खते, मजुरी, बी- बियाण्यासाठी आलेला खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. जमाखर्चाचा ताळमेळ बसविण्याचा शेतकरी प्रयत्न करीत असताना, रब्बी बियाण्याची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करीत असताना जमिनीतील ओल कमी झाली. शेतात तुषारने किंवा सरवणी पाणी दिल्याशिवाय रब्बी पेरणी करणे शक्य नव्हते. त्याचबरोबर अर्धवट ओल असलेल्या शेतीत हरभरा, ज्वारी, करडई, गहू आदीची पेरणी केल्यानंतर पाण्याची अत्यंत गरज होती. रब्बी पेरणीसाठी, शेतात पेरलेल्या बियाण्याला उगवण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना ऐन मोक्याच्या वेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलाचे कारण पुढे करुन विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य रब्बी हंगाम धोक्यात आला असून शेतकरी संकटात सापडला आहे.