
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पूर्णा येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरु असून ते अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. ज्यामुळे सदर पुलाजवळील रस्ता वाहनांना वाहतूकीस कष्टप्राय ठरला जात आहे. प्रसंगी तो जीवघेणा सुध्दा ठरला जाऊ शकतो यात शंकाच नसावी. वारंवार सांगून, अर्ज विनंत्या करुनही कोणालाच जाग येत नव्हती. माल खचाखच भरलेली वाहने कधीही पलटी होऊन त्यात मालाचे, वाहनांचे तथा मानवीय नुकसान कधीही होऊ शकते, हे कोणीही नाकारू शकणार नाही. वळणावर असलेला हा रस्ता अत्यंत धोकादायक असल्याने कित्येक वाहनधारक आपला जीव मुठीत धरून वाहतूक करताना आढळून येत असतात. मस्त लाल ठेकेदार व ढीम्म रेल्वे प्रशासन कोणतीच दखल घेत नव्हते. त्याचाच परिपाक म्हणून पूर्णा व परिसरातील व्यापाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा व रस्ता रोखोचा इशारा दिला होता. व्यापाऱ्यांचा संताप कमालीचा अनावर झाला होता. आंदोलनाची व्यापकता व तीव्रता ध्यानी घेऊन अखेर ढीम्म प्रशासन व मस्तवाल ठेकेदाराला ही पूर्ती जाग आली ज्यामुळे त्यांना सदरचा वाहतूकीसाठी जीवघेणा ठरला जाणारा रस्ता तात्काळ सुधारुन दिला जाईल, आंदोलन केले जाऊ नये असे लेखी आश्वासन देणे भाग पडले.
कासवाच्या गतीने सुरू असलेल्या सदर उड्डाणपूलाच्या बांधकामाला गती देऊन ते काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेणे गरजेचे असताना ते तसे न करता शेतकरी वाहन धारक व व्यापारी वर्गांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात होते. चालू वार्ता या मराठी दैनिकाने सुध्दा यापूर्वी अनेकदा आवाज उठविला होता. खडबडून जागे झालेल्या मस्तवाल ठेकेदाराला व रेल प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देऊन जाग आणण्यात व्यापारी वर्गाला भरीव यश मिळाले आहे. तथापि दिलेल्या आश्वासनामुळे तूर्त संस्थगित करण्यात आलेले आंदोलन भविष्यात पुन्हा कधीही छेडले जाऊ शकते याची मात्र हम्मी देणे कठीण आहे.