
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
यवतमाळ;- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार ‘ या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत यशवंत मनोहर यांना जाहीर करण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. एक लाख रूपये रोख, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
समाज, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. कविसूर्य म्हणून प्रसिद्ध असलेले यशवंत मनोहर यांनी शंभराहून अधिक वैविध्यपूर्ण पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांचा समावेश आहे. प्रखर आंबेडकरवादी निष्ठा ही यशवंत मनोहरांचा प्राण आहे. संविधान निष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासाठी त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भुमिका प्रेरणादायी अश्याच आहे. त्यांच्या रूपाने एका युगसाक्षी प्रतिभेचा सन्मान या निमित्ताने होत आहे.
यापुर्वी हा पुरस्कार शरद यादव,अरुंधती रॉय,भालचंद्र नेमाडे,शरद पवार,भूपेश बघेल, बाबा आढाव , भालचंद्र मुणगेकर, रावसाहेब कसबे, कुमार केतकर,फादर फ्रान्सिस दिब्रिटो,आ.ह. साळुंखे, उत्तम कांबळे इत्यादी मान्यवरांना दिला गेला आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात खा. अमोल कोल्हे, समीर भुजबळ, रूपाली चाकणकर, पंकज भुजबळ, हरी नरके, बाळासाहेब शिवरकर, कमल ढोले पाटील, दिप्ती चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कारासाठी प्रशांत वंजारे, प्रकाश राठोड, मनोहर नाईक, सर्जनादित्य मनोहर, अनमोल शेंडे, संजय मोखडे आदींनी डॉ. यशवंत मनोहर यांचे अभिनंदन केले आहे.