
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी जिल्हा-दत्तात्रय कराळे
“”””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी शहरापासून अगदी आठ ते दहा कि.मी. अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र (श्रीक्षेत्र) त्रिधारा हे हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तीन नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला असल्यामुळे या पवित्र स्थानाला अधिक महत्त्व आहे. केवळ गोर- गरीबच नव्हे तर असंख्य असे गर्भश्रीमंत व्यापारी नागरिक आणि नामवंत राजकारणी मंडळी सुद्धा या पवित्र श्रध्दास्थानाला नतमस्तक होत असतात. भाविक भक्तांच्या ठायी ठायी रुजलेले हे श्रध्दास्थान प्रत्येक अमावास्येला भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून भरल्याचे दिसून येत असते.
या तीर्थस्थानाप्रति प्रत्येकाच्या मनात धार्मिक भावनेची नाळ जोडली गेल्याचे म्हटले जाते. श्री दत्त दिगांबरांशी सांप्रदायिक घनिष्ठता स्थापित ऊंबरातून अर्थात शनी मंदीराच्या खालून अदृष्यपणे वाहणाऱ्या नदीला डाव्या व उजव्या अशा दोन नद्या पूर्ववत वहाणाऱ्या नदीला येऊन मिळतात त्यामुळे तीन नद्यांचा एकत्र संगम होतो असतो. किंबहुना त्याच
स्थानाला त्रिधारा संगम असेही संबोधले जाते. पर्यायाने कोणतीही वाहणारी अथवा उगम पावलेली नदी पवित्र अशीच मानली जाते. मग येथे तर चक्क तीन नद्या एकमेकांमध्ये विलीन झाल्या आहेत त्यामुळे या स्थानाला त्री संगमाची उपाधी प्राप्त झाली असल्याने हे स्थान अधिकच पवित्र व श्रद्धामय बनले गेले आहे.
ओंकारेश्वर नामक महात्म्यांनं आपलं वास्तव्य या ठिकाणी अनेक वर्षे केल्यामुळे या स्थानाची पवित्रता व धार्मिकता यांची महती अधिकच वाढली गेली आहे. श्रद्धेपोटी येथे येणाऱ्या भाविक भक्तांना दर्शनाची, वास्तव्याची आणि भोजनाची सहजतेने उपलब्धी व्हावी यासाठीचे महाराजांनी केलेले प्रयत्न बऱ्याच अंशी फलदायी ठरल्याचे दिसून येत आहे. येथे येणाऱ्या भाविकांना त्याचा लाभ घेता यावा म्हणून येथील सदर श्रध्दास्थानाचा महाराजांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय येथे येणारा कोणीही भक्त उपाशीपोटी राहू नये या भावनेने अनेक दानशूर भक्तांच्या उदात्त हेतूने ते पूर्णत्वास नेले जात असते. पवित्र व त्रिसंगमीय स्थानावर सुग्रास अशा भोजनाचा आस्वाद मिळवा व ते भाग्य आपल्याला लाभले जावे यासाठीची भावना प्रत्येक भक्तांच्या ठायी रुजलेली आढळून येत असते. त्याचीच फलश्रुती म्हणून या स्थानावर दर्शन व मनोरंजन म्हणून आवर्जून
येणाऱ्या (लहान लहान) बच्चे कंपनी पासून ते वयोवृध्दांपर्यंतचे महिला व पुरुष भाविक भक्त येथे मोठ्या संख्येने श्रध्देपोटी येत असतात.
या पवित्र स्थानावर हार, फुलांची अनेक दुकानं थाटली जातात. प्रसादासाठी आवश्यक अशा विविध मिठाईच्या वस्तूंची अनेक दुकाने येथे सजलेली दिसतात. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पुंग्या, तुताऱ्या, शिट्ट्या यासारख्या नानाविध खेळण्यांची साहित्य असणारी दुकाने सुध्दा बऱ्यापैकी आढळून येतात. ऊसाचा रस, आमलरस, पायनापल व मोसंबी रसाची दुकाने हौशा-गवशा-नवश्यांना आपली तृप्ती करण्यासाठी खुणावत असतात. झुले, आकाश पाळणे, घोडे यासारखी मनोरंजनाची कला दालने उभारुन मुलांचे मनोरंजन करण्यावर भर देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पोटापाण्याचाही प्रश्न या निमित्ताने सुटला जातो. त्रिसंगमीय स्थानावर पवित्र स्नान करुन महिला-पुरुष भक्तगण येथे असलेल्या देवांना हार फुले अर्पण करीत असतात.
श्री ओंकारेश्वर नामक महात्म्याच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या स्थानाच्या भक्तीमय पावित्र्यात मोठी भर पडली गेली. त्याचाच एक भाग म्हणून येथे दररोज उठल्या जाणाऱ्या अन्नदानाच्या पंगतीची महती वर्षानुवर्षे आजही कायम दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक महान दानशूर व्यक्ती येथील अन्नधान्याचा डी आवश्यक साहित्य उदार अंतःकरणाने देण्यासाठी अग्रेसर असतात. त्याचीच परिणीती म्हणून अनेक कोठारे धन-धान्यांनी भरुन असल्याचे आजही पहावयास मिळत असते.
या पवित्र स्थानाचे महत्त्व जसे मध्यम वर्गियांना आहे किंबहुना तसेच राजकारणी मंडळींना सुध्दा असल्याचे बोलले जात आहे. या स्थानाची महती केवळ परभणी जिल्ह्यापुरतीच सिमीत नसून संबंध मराठवाड्यातील जनतेत पोहोचली आहे. त्याचाच भाग म्हणून राजकारणी मंडळींचे सुध्दा येथे आगमन होत असते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांसह खा. संजयजी जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, शिवाय अनेक खासदार, आमदार यांच्यासह अनेक नामवंत नेते मंडळींनी या ठिकाणी येऊन श्री ओंकारेश्वर महाराजांचे व या पवित्र स्थानाचे दर्शन घेतले आहे.
सन १९९० साली श्री ओंकारेश्वर महाराजांचे देहावसान झाले आहे. तेव्हापासून समस्त भक्तगण त्यांच्याप्रति असलेली भक्तीमय भावना अंगी जोपासत असतात. महाराजांच्या आसनस्थ गादीला त्यांचे प्रतिरुप समजून त्या गादीचे दर्शन घेऊन आपली इच्छापूर्ती साध्य झाल्याची भावना व्यक्त करीत असतात. येथे येणारा प्रत्येक भक्त तृप्त झाल्याचे समाधान मानत असतो. महाराजांच्या देहावसानानंतर श्री शेषराव लोकरे नामक बाबा या देवस्थानांची पूजा-अर्चा आणि देखभाल करीत असतांत. येथे श्री शनी देव, श्री हनुमान जी, श्री भोलेनाथ, श्री विठ्ठल रखुमाई व श्री ओंकारेश्वर महाराजांची (समाधी स्थान) देवस्थानं आहेत. दर अमावास्येला येणाऱ्या भक्तांच्या मोठा तांतां अगदी जत्रेच्या स्वरुपात दिसून येत असते. एकादशी व द्वादशीला त्याचबरोबर गोकुळाष्टमीला येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. भंडारा-जेवण असते.
संबंध मार्गशीर्ष महिनाभर येथे भक्तांकडून अभिषेक केले जातात.
परभणी ते वसमत या महामार्गावर असलेल्या या प्रसिद्ध देवस्थानाला येण्यासाठी महामार्गालगत एक मोठी कमान आहे. तेथून प्रवेश केल्यानंतर एक-दीड कि.मी.अंतरावर हे देवस्थान आहे. श्री ओंकारेश्वर महाराजांनी या स्थानाला प्रसिद्ध असे देवस्थान बनवून समस्त भक्तगणांचे श्रध्दास्थान निर्माण केले आहे. याचे पावित्र्य कायम टिकून राहिले जाईल यासाठीचे त्यांनी महाकाय असे प्रयत्न केले असल्याची पावती आजमितीलाही दिसून येत आहे. दर सोमवारी श्री ओंकारेश्वर महाराजांच्या गादीचे दर्शन घेणारे हजारो भक्त गण मागील अनेक वर्षांपासून ची परंपरा कायम टिकवून आहेत. जोपर्यंत महाराजांच्या गादीचे दर्शन होणार नाही, तोपर्यंत त्यांना चैन पडणार नाही, असेही असंख्य भक्त आहेत. येथे दर्शन घेतलेला प्रत्येक भक्त आपली तृप्ती झाल्याची भावना व्यक्त करीत असतो ही आख्यायिका मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
संपूर्ण परभणी जिल्हा हा निरनिराळ्या देवी-देवतांचे व जन्मस्थानांचे व श्रद्धेचे पवित्र स्थान असल्याने प्रसिद्ध आहे. भौगोलिक विकासाच्या दृष्टीने जरी मागासलेला हा जिल्हा असला तरी तो ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या मात्र प्रसिद्ध असून तो नावारुपाला आलेला आहे,हे मुळीच नाकारता येणार नाही.