
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
कर्तुत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या अन् महिला क्रिकेटमधील धोनी अशी ओळख प्राप्त झालेल्या सोलापुरच्या खेड्यातील महिला क्रिकेटपटू “किरण नवगिरे” यांचा “अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” च्या वतीने सन्मान करण्यात आला.
अविरत परिश्रमाच्या जोरावर सोलापुरातील मिरे ते इंग्लंड असा एक प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या महिला क्रिकेटपटू किरण नवगिरे या मुलीची भारतीय महिला क्रिकेट टी२० संघात निवड झाली. भारतीय महिला क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० आणि एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघात स्थान मिळविणारी किरण पुण्यातील पहिलीच खेळाडू आहे. त्याचबरोबर मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये देखील किरण आपली कामगिरी दाखवणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन काळात किरण एक मैदानी खेळाडू होती. तिने २०११-१२ आंतर-विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेले आहे. याशिवाय विविध ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये आजवर तिने सुमारे १०० पदकांची कमाई केलेली आहे.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने या सन्मान सोहळ्या प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, नियती जाधव, सुधीर साकोरे, योगेश निकम, शेखर पवार, तसेच अक्षय लावंड उपस्थित होते. शाल, मानाचा फेटा व सन्मान चिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.
निवृत्ती जाधव म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत महिला क्रिकेट संघात आपली ओळख निर्माण करणाऱ्या किरण नवगिरे या मराठी मुलीला तसेच इतर महिला क्रीडापटुंना प्रोत्साहन देण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले.
या सनमनचे आभार मानताना किरण नवगिरे म्हणाल्या, छोट्या गावातून आल्यामुळे खूप साऱ्या अडचणी आल्या. परंतु, कुटुंबाचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे मला क्रीडा क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आता पुणे मुंबई सारख्या शहरात मुलांइतकीच मुलींना देखील खेळण्यासाठी सुविधा मिळते. त्यामुळे मुलींनी देखील सकारात्मक भावना मनात ठेवून क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे.
ट्रस्टच्या उपस्थित सदस्यांनी किरणचे अभिनंदन करून येणाऱ्या सर्व क्रीडा शृंखलांसाठी शुभेच्छा दिल्या तसेच उज्वल भविष्यासाठी मंडई म्हसोबा चरणी प्रार्थना केली. करिश्मा शेख यांनी सूत्रसंचालन केले.