
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर गावातील चौका-चौकात निवडणुकीच्या प्रचारात बॅनर, पोस्टरची स्पर्धा लागली आहे. आपल्या समर्थकांच्या घरी विरोधकांचे बॅनर कसे यावर चर्चा रंगत आहे. कुणी समर्थकांना पैसे देऊन आपल्याकडे खेचून घेतले, तर कुणी जातीचा उमेदवार आहे म्हणून त्यांच्यासाठी प्रचारात फिरत आहेत. मात्र काही गुणवान शिलवान, चारित्र्यवान उमेदवार असूनही मात्र पैशाविना मागे पडत आहे.
निवडणूक म्हटल की, जातीच्या उमेदवाराला मतदान दिले जाते. किंवा श्रीमंताच्या पैशालाही अनेक जण बळी पडतात. त्यामुळे कोणतीही निवडणूक गोरगरीबांची राहीली नाही. निवडणुकीत उमेदवार सर्वगुण संपन्न असावा. श्रीमंत
असावा असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वाटते. मतदार यादी तसेच निवडणुकीचा जमाखर्च ठेवण्यासाठी तसेच प्रचाराला घरोघरी जाण्यसाठी कार्यकर्ते लागतात. अनेकांना निवडणुकीचा कटू अनुभव असल्यामुळे अनेक जण फुकटात कोण जाणार ? पैसे देत असाल तर प्रचाराला येवू असे रोखठोकपणे सांगतात. त्यामुळे खाणपाणासाठी मोठी रक्कम दिली जाते. ती रक्कम गोरगरीब उमेदवाराकडे नसल्याने निवडणुकीचा ताळमेळ जमविण्यास अशा उमेदवारांसाठी दुरापास्त होते.
त्यामुळेच गुणवान, शिलवान, चारित्र्यवान उमेदवार असूनही श्रीमंताच्या पैशापुढे अशा उमेदवारांना पराभव पत्करावा लागतो. मात्र, एकदा तो निवडून आला की आपल्या पुढील पिढ्यांसाठी तो संपत्ती कमावून घेतो. त्यामुळे निवडणूक गोरगरीबांची राहीली नसून पैस्यावाल्याची झाली आहे.