
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीची निवडणूक जाहीर झाली आहे.निवडणुकीची तारीख तोंडावर येताच निवडणूक आयोगाने राज्यात संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण समोर करून सहकार क्षेत्रातील निवडणुका रद्द केल्या होत्या.त्यानंतर पंधरा दिवसातच शासनाने आदेश देत येत्या २५ डिसेंबर रोजी सदर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाची निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले असून २६ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यामुळे आता पुन्हा या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे.या सहकारी शेतकी खरेदी विक्री निवडणुकीत एकूण १७ संचालक पदाकरिता किसान समता पॅनल,सहकार पॅनल,शेतकरी पॅनल या तीनही पॅनल मिळून तब्बल ५१ उमेदवार रिंगणात असून येथील निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.आता दर्यापूर शेतकी खरेदी-विक्री करिता होऊ घातलेल्या या निवडणुकीत “बाजी मारणार तरी कोण?” ह्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.