
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनीधी:- शिवकुमार बिरादार
सर्वसामान्यांच्या वाट्याला आलेलं जगणं मी पण जगत असतो, अनुभवत असतो आणि तेच आपल्या कवितेतून मांडत असतो. बालपणी कविता पाठ होत्या म्हणून कौतुक करणाऱ्या बाई मला आजही लक्षात आहेत. कविता पाठांतरामुळे मला जगण्याचा सूर सापडला, पुढे कविता हीच माझ्या यशस्वी जगण्याची ऊर्जा ठरली, असे भावोत्कट उदगार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, चित्रपट गीतकार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने “शब्दशाहिरी” या भितीपत्रकाच्या कविता विशेषांकाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रा. दासू वैद्य बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात आपण जन्मलो म्हणून न्यूनगंड नसावा. उलट ग्रामीण भागात प्रतिभा शक्ती जास्त असते. ही प्रतिभा शक्ती ओळखा आणि ती विकसित करा. बालपणातील माझ्यावर झालेले संस्कार आणि ज्या मातीतून मी जन्मलो त्या मातीचा ओलावा नेहमी माझ्या कवितेत डोकावत राहतो. आपण केलेले कार्य हे भविष्यात आपल्याला मोठे करतं म्हणून आपण सतत आपल्या वाचनात, लेखनात, कृतीत व सामाजिक कार्यात कार्यरत राहिले पाहिजे, असे चिंतनशील विचार याप्रसंगी कवी दासू वैद्य यांनी मांडले. आणि कविता विशेषांकाचे कौतुक त्यांनी केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे , उपप्राचार्य प्रा. संजीव डोईफोडे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रा. दासू वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. राम धारासूरकर, डॉ. केशव पाटील, प्रा. बसवेश्वर स्वामी यांनी सुद्धा पुस्तक भेट देऊन कविवर्यांचे यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.