
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:- महाराष्ट्रातील शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या एकमेव असलेल्या जव्हार नगर परिषदमध्ये जव्हारकऱ्यांच्या सेवेसाठी १९८५ साली दाखल झालेल्या मधुकाका बात्रे हे वयाच्या ६० व्या वर्षी अखेर जव्हार नगर परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.सेवेत दाखल झाल्यानंतर तब्बल ११ वर्ष त्यांनी रोजंदारीवर सेवा देऊन तात्कालीन नगराध्यक्ष ॲड.राजाराम मुकणे यांच्या प्रयत्नानंतर १९९६ साली मधुकाकांना सेवेत कायमस्वरूपी करण्यात आले.जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले मधुकाका यांनी सुरुवातीला आपली शेती आणि हाताला मिळेल ते काम करत आयुष्याची सुरुवात केली.
त्यांनी नगर परिषदेमध्ये काम करताना “मी नगरपरिषदेचा आणि नगरपरिषद माझी” ही भावना मनाशी बाळगून नगरपरिषद कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांची व व्यवस्थापनाची पाण्याचा ग्लास देत तब्बल ३७ वर्ष सेवा केली.अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे असलेले मधुकाका हे उत्सव प्रेमी ही होते.त्यांनी मागील दहा-बारा वर्षांपूर्वी सनसेट पॉईंट येथील शिवनेरी नगर येथे जगदंबा उत्सवाचे आयोजन करून त्याचप्रमाणे जव्हार शहराच्या मध्यभागी असलेले गांधी चौक येथे सार्वजनिक श्री जगदंबा महोत्सव व त्यानिमित्ताने आयोजित होणारे विविध शिबिरे यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.अशा या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने जव्हार नगरी वासियांना सेवा देऊन ते अखेर सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात जव्हार नगरपरिषदेचे प्रशासन व मधुकांकावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी त्यांना निरोप देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.