
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
माजी आमदार व माजी खासदार जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या 102 व्या वर्षी 1 जानेवारी रोजी रविवारी दुपारी 1:20 वाजता उपचार दरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले.
मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ख्याती होती. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वतःला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने विधिमंडळ आणि संसदेत मांडले.
केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. जनतेवरचं त्यांचे प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले.
कामगार पक्षाचा पताका आयुष्यभर घेऊन जगलेले भाई केशव धोंडगे हे विधिमंडळातील मुलुख मैदानी तोफ होते. भाई धोंडगे यांची भाषणे ही सभागृह दणाणून सोडणारी होती.
भाई धोंडगे यांनी 1975 साली आणीबाणीच्या विरोधात आंदोलन केले. त्या आंदोलनात त्यांनी नाशिक जेल मध्ये 14 महिने कारावास भोगला.विशेष म्हणजे आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि दिल्लीत आपले वजन निर्माण केले. मात्र, 1995 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. मोठ्या मनाने त्यांनी तो पराभव स्वीकारला होता. शरद पवारांचा भरस्टेजवर मुका घेण्याचे धाडसही त्यांनी नांदेडमधे एका कार्यक्रमातून दाखवून दिले होते.
सीमा प्रश्नविषयी 1958 ला मालकी जेल (कर्नाटक) मध्ये दीड महिना जेल भोगली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात निजाम राजवटीच्या विरुद्ध काम केल्याने शासनाच्यावतीने त्यांना स्वतंत्र सैनिक म्हणून गौरवन्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव नांदेडच्या विद्यापीठाला देण्यासाठी भाई धोंडगेचा आग्रह होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ती मागणी मान्यही केली. भाई धोंडगे यांनी गोरगरिबांच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक सत्याग्रह केली. गुराख्याना पेन्शन मिळालेच पाहिजे हा त्यांचा नारा होता. उपेक्षित, नाहिरेवाल्यांची, पोतराजांची मुले वकील झाली पाहिजेत यासाठी कंधारमध्ये त्यांनी विधी महाविद्यालय स्थापन करून मातोश्री मुक्तईंचे स्वप्न साकार केले.शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाची रोपवाटिका वाढवली व गोरगरिबांच्या मुला – मुलींना डॉक्टर, इंजिनियर,वकील अश्या विविध पदांवर काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण केले.
भाई धोंडगे हे जेष्ठ पत्रकार, साहित्यिक संपादक होते. साप्ताहिक जयक्रांतीच्या माध्यमातुन त्यांनी अनेक ज्वलंत प्रशांना वाचा फोडल्या. म्हणून 2012 साली त्यांना जेष्ठ संपादक म्हणून बाळ शास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी बहाल करण्यात आली. शतकोत्सवी वर्षानिमित्त भाई धोंडगे यांचा राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्यावतीने आणि विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाच्यावतीने 24 ऑगस्ट 22 रोजी त्यांचा गौरव करण्यात आला.. हे नेतृत्व 1 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1:20 वाजता औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटल येथे काळाच्या पडद्याआड गेले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज 2 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 2 वाजे पर्यंत त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड कंधार येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा शहरातील मुख्य रस्त्याने निघणार असून आज दुपारी 4 वाजता क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे…