दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शिवसेना प्रमुख स्व.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात शिव-पुराण कथेचं आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाची पूर्वतयारी जोमाने सुरु असल्याचे सोहळ्याचे आयोजक तथा परभणीचे लोकप्रिय जनसेवा, शिवसेना खासदार संजय जी जाधव यांनी सांगितले आहे.
विशाल कदम आणि गंगाप्रसाद आनेराव या दोन्ही शिवसेनेच्या आजी-माजी जिल्हा प्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत बोलतांना खा. जाधव पुढे असेही म्हणाले की, सुमारे २८५ बाय ७०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या भव्य अशा सभामंडपात एकही खांब उभा केला जाणार नाही. ज्यामुळे कोणाही भाविक भक्तांना शिवपुराण कथा ऐकतांना किंवा प.पू.सद्गुरु प्रदीप मिश्रा जी यांच्या दर्शनासाठी सुध्दा कोणताच अडथळा निर्माण होणार नाही. कोणत्याही खांबाविना बनविले जाणाऱ्या या सभा मंडपाच्या निर्मितीसाठी जशी जर्मनी टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे किंबहुना तशीच धार्मिक आयडॉलाजी वापरुन संजय जी जाधव हे खासदार या नात्याने मतदारांशी बांधिलकीचे नाते सदैव जपत आले आहेत. मग ते धार्मिक कार्यक्रम असोत वा सांस्कृतिक, सामाजिक असोत वा शैक्षणिक यात ते सदैव अग्रेसर असतात. दहीहंडी असो वा नवरात्रीचा दांडिया, दिवाळी असो वा होळी, सण नवचैत्राचा वा तिळगुळ आणि साडे तीन मुहुर्तांपैकी एक अशा दसरा सणाच्या, सर्वांशी समन्वय राखत, सामोपचाराने व खेळीमेळीच्या वातावरणात ते मिळून मिसळून परंपरागत ते साजरे करीत असतात. परभणी शहर व जिल्ह्याला सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असल्याने समस्त मतदार जनतेची सांप्रदायिक या जपण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. इतकंच नाही तर श्री क्षेत्र आळंदी व पंढरपूरला पायी. चालत जाऊन याच मतदार राजांसाठी विठूरायांना प्रतिवर्षी साकडं घालून आळवणी करीत असतात. मतदारांना नेमकं कधी आणि काय रुचलं जातं, यांचा व्यासंगी अभ्यास असलेले संजय जी जाधव यांच्यावर अनेक राजकीय (पक्षांचा) डोळा असला तरी ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर अजूनही निष्ठा कायम ठेऊन आहेत एवढे नक्की.
भव्य-दिव्य अशा या कार्यक्रमाचे श्रवण आणि आस्वाद घेण्यासाठी लाखो भाविक भक्तांची मांदियाळी होणार हे लक्षात घेऊन खा.जाधव यांनी या कार्यक्रम स्थळा सभोवताली सर्वत्र वाहने उभी करण्यासाठीची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी आवश्यक व पुरेपूर अशी विद्युत व्यवस्था आणि अद्ययावत सुरक्षा म्हणून तिसरा डोळा म्हणजेच सीसीटिव्ही ची पूर्तता जशी सभामंडपात केली जाणार आहे किंबहुना तशीच व्यवस्था वाहन तळावरही केली जावी अशी भक्तांची मागणी पुढे आल्यास चुकीची ठरु नये. त्यासाठी सहानुभुतीने विचार झाल्यास दुग्धशर्कराजन्य प्रसंग असेच म्हणावे लागेल. दुपारी ३ ते रात्रौ ९ वाजे दरम्यान कथेचं श्रवण असल्याने भक्तांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी असू शकते. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या परिसरात वा शहरात कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या पाथरी रोड भागातून नियमित कार्यरत असणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली जावी, जेणेकरुन कार्यक्रमाला व भाविक भक्तांना ये-जा करतांना कोणताच त्रास होऊ नये आणि कार्यक्रमाचीही शोभा वाढली जावी हा शुध्द हेतू पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


