दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पूर्णा : गंगाखेडसह पूर्णा, पालम या तिन्ही तालुक्यात पत्रकार भवन उभारले जाईल, असा संकल्प गंगाखेड चे रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे. ते काल पूर्णा येथील एका कार्यक्रमात पत्रकार बांधवांसाठी उद्देशून बोलत होते. ज्यामुळे पत्रकारांना तेथे थांबून वृत्तांकन करणे सुलभ होईल, गोर गरीब व शेतकरी वर्गांच्या समस्या मांडणे शक्य होईल, शासन प्रशासनाचे लक्ष वेधणे सोपे जाईल, त्या दृष्टीने सांगोपांग विचार विमर्ष करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना तेथे थांबून अनेकांशी संपर्क साधणे सहजगत्या उपलब्ध होऊ शकेल, पत्रकारांच्या बैठका, कार्यक्रम यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल असाही मनोदय आ.गुट्टे यांनी व्यक्त केला.
त्याही पुढे जाऊन ते असेही म्हणाले की, जनसामान्यांचा अहोरात्र विचार करणाऱ्या यापैकी बऱ्याच पत्रकार बांधवांना राहाण्यासाठी स्वमालकीचं घरही नसावं परंतु पत्रकारितेचा वसा टिकवून ठेवतात. त्यासाठी ज्या कोणा पत्रकार बांधवांना सहकार्य हवं असेल त्यांनी जरुर सांगावं, जेणेकरुन शासनापर्यंत हा विषय पोहोचवता येईल. मी स्वतः सोबत येऊन संबंधितांवर व्यक्त हा विषय नेणं सोपं जाऊ शकेल. एकूणच काय तर पत्रकारांच्या प्रति आ. गुट्टे यांची जी तळमळ आहे, ती खरोखरंच उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल.
कांही दिवसांपूर्वीच डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी अशीच एक घोषणा करुन गावखेड्यातील कारभार सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांनाही दिलासा देण्याचे काम त्यांनी त्या भागाचे आमदार म्हणून केली आहे. खेड्यात राहून गावच्या समस्या मार्गी लावतांना संबंधित पोलीस पाटलांना पोलीस ठाणे किंवा तालुकास्तरारील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची भेट घेणे सोईचे व्हावे, बैठकांमध्ये चर्चा करता यावी, गावखेड्यातील सर्व नागरिकांशी व अधिकाऱ्यांशी समन्वय राखणे सोईचे ठरु शकेल यासाठी नियोजित पोलीस पाटील भवन अत्यंत उपयोगी ठरले जाईल यात तिळमात्र शंका नसावी. किंबहुना पत्रकार भवनाचा ही तसाच काहीसा उपयोग समस्त पत्रकार बांधवांसाठी करुन घेतला जाऊ शकेल.
आमदार म्हणून डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मांडलेल्या दोन्ही संकल्पना अतिशय चांगल्या व समाजोपयोगी ठरल्या जाऊ शकतील. पोलीस पाटील भवन त्या त्या तालुक्यात उभारले गेल्यास लोकहिताच्या कामांचा उरक (निपटारा) त्या त्या पोलीस पाटलांना करता येईल तर दुसरीकडे त्या त्या तालुक्यातील पत्रकारांनाही गोरं गरिबांच्या समस्येची उकल होण्यासाठी वृत्तांकनाव्दारे शासनाकडे दाद मागणे सोईचे होईल. सुखद मनाने बातम्या लिहिणे अथवा सखोल विचार विमर्ष करणे, पत्रकारांच्या बैठका घेणे, कार्यक्रम पार पाडणे या व अशा अनेक सोपस्कारांसाठी नियोजित पत्रकार भवनाचा उपयोग करणे शक्य होईल. तथापि उक्ती आणि कृती मध्ये बरेच अंतर असू शकते. राजकीय पुढारी, नेते किंवा लोकप्रतिनिधी यांनी दिलेली सर्वच आश्वासने खरीच ठरली जातात असे नसते. किंवा तसा शक्यतो कोणी विश्वासही ठेवत नसतात परंतु आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिलेली आश्वासने नसून ती एक प्रकारची हम्मीच असू शकते असा विश्वास बाळगायला मुळीच हरकत नसावी. कारण त्यांनी कांही दिवसांपूर्वीच मतदारांना उद्देशून केलेले एक वक्तव्य फार बोलके आहे. धर्मावर बोट ठेवून भावनिक नाते जोडणारे दिसून आले. “तुम्ही जर निवडून दिले नसते तर, मला नक्की आत्महत्याच करावी लागली असती, नव्हे अन्य दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर नव्हता” हे त्यांचे वाक्य खरोखरच मनाला भावणारे होते. वेदना देणारे वाटले. काळजाला घरं करणारे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी मागील काळात सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्या काही बऱ्या वाईट चुका केल्याच असतील, तर त्यासाठी सरकार, कायदा बघून घेतील परंतु पश्चात्ताप म्हणून जे काही चांगले करणे दायित्व आवश्यक आहे, ते आमदार म्हणून डॉ. रत्नाकर गुट्टे हे निश्चितपणे करु शकतील असं समजून घ्यायला काहीच हरकत नाही. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी दोन वर्षांचा कालावधी अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात सर्व काही दिसून येणारच आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. गुट्टे यांनी आमदार म्हणून केलेली असंख्य नागरी व विकास कामे पहाता त्यांच्यात झालेले मोठ्या परिवर्तनाची ती यशस्वी नांदीच म्हणावी लागेल एवढे खरे.


