दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असून,कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्ष,भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.आचारसंहितेचा भंग करणारे फलक आदींबाबत कारवाईसाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत,असे जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे उपस्थित होते.
श्रीमती कौर म्हणाल्या की,अमरावती जिल्ह्यात ३३ हजार २३६ पुरूष,२३ हजार ३२९ महिला, इतर ६४ असे एकूण ५६ हजार ६२९ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे.अमरावती तालुक्यात २७ हजार ८०३,भातकुली तालुक्यात ८८२,तिवसा तालुक्यात १४१८,चांदूर रेल्वे तालुक्यात १५३१,धामणगाव रेल्वेमध्ये १ हजार ५८२,नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १ हजार १८ मतदारांची नोंदणी झाली आहे.
त्याचप्रमाणे,मोर्शी तालुक्यात २ हजार ८२,वरूड तालुक्यात ४ हजार ११२,अचलपूर तालुक्यात ५ हजार १३३,चांदूर बाजार तालुक्यात २ हजार ८२३,दर्यापूर तालुक्यात ३ हजार ३८८,अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३ हजार ५३१,धारणी तालुक्यात ९८०,चिखलदरा तालुक्यात ३४६ मतदारांची नोंदणी आहे. जिल्ह्यात एकूण ७५ मतदान केंद्रे आहेत.
पदवीधर निवडणुकीचे काम सुरळीत पार पडण्यासाठी विविध कक्ष व नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी ceoelection.maharashtra.gov.in./gtsearch/ ही लिंक विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.दरम्यान,जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.


