दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
२७ ऑक्टोबर २२ ला सनसणीत वृत्त प्रकाशित करुन उठवला होता आवाज; भरीव यश
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
आमचा पुढचा लढा….जालना येथे स्थलांतरित कामगार न्यायालयासाठी ! तेही परभणीत आणले जाईलच….तोवर लढा सुरुच राहील !
“”””””””””””””””””””””“””””””'”””””””””””””
परभणी : मागील दोन वर्षांपूर्वी परभणी येथून हिंगोलीत स्थलांतरित करण्यात आलेले आयकर विभागाचे कार्यालय पुन्हा परभणीत कार्यान्वित करण्याचे आदेश आयकर विभागाचे मुख्य आयुक्त प्रवीण कुमार यांनी निर्गमित केले आहेत.
त्यामुळे परभणीत फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी शासनाने उचललेले चुकीचं पाऊल आणि त्याविरोधात कोणताही परखड आवाज न उठविता आळी मिळती चुप करुन बसलेले परभणीचे राजकीय मंडळी यांच्या विरोधात घणाघाती टीका करुन चालू वार्ता या दैनिकाने २७ ऑक्टोबर २२ आणि त्या नंतर पुन्हा एकदा देशाचे अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांना उद्देशून प्रकाशित वृत्ताद्वारे परभणीच्या जनतेच्या वतीने परखडपणे आवाज उठविला होता. आश्चर्यकारक म्हणजे आमच्या घणाघाती टीकात्मक वृत्ताला बगल देत अगदी सोयीस्करपणे श्रेय घेण्याचा ज्या कोणाकडूनही प्रयत्न झाला आहे, त्यांचे श्रेय त्यांना मुबारक होवो, अशीच आमची धारणा आहे. कारण आमची बांधिलकी जनतेशी आहे. आमच्या प्रिय वाचकांशी आहे. हितचिंतक व जाहिरातदारांशी आहे. न की, अन्य कोणा श्रेय लाटणाऱ्यांशी वा लुटणाऱ्यांशी !
शेवटी कोणाच्याही नथीतून का होईना परंतु तीर मारला गेला कार्य सिद्धीस गेले एवढे मात्र खरे.
परभणी येथे कार्यरत आयकर विभागाचे कार्यालय हिंगोलीत स्थलांतर करुन तत्कालीन शासन कर्त्यांनी मोहम्मद मुघूलांच्या जाण्यानंतर ही जी तुघूलुकी अंमलात आणली ती किळसवाणी चीड निर्माण करणारी नक्कीच ठरु शकेल. परभणीच्या आयकर दात्यांवर अन्याय करुन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं होतं हे कुटील कृत्य ही झाकून राहिलेले नाही. परभणीतील जनता संयमी आहे. त्याचाच परिपाक म्हणून येथील कामगार कार्यालय सुध्दा जालना येथे स्थलांतरित केले आहे. परिणामी परभणी जिल्हा क्षेत्रातील कामगारांवर कमालीचा अन्याय करुन त्यांना पूरते वेठीस धरले जात आहे. आणखी किती काळ परभणीची जनता अशाप्रकारचा अन्याय सहन करणार आहे. खंबिरपणे जागृत राहिले असता तर पूर्णा-परभणीची शान असलेला पूर्णा येथील रेल्वे विभागाचा कारोभार नांदेडला बळकावून नेता आलाच नसता.
डॉ. भागवत कराड हे योगायोगाने मराठवाड्यातील औरंगाबादचे, त्यात त्यांना राजकीय सुंदोपसुंदीतून मिळालेले केंद्रीय मंत्रीपद किमानपक्षी परभणीच्या विकासासाठी व येथून राजकीय असूयेपोटी जे जे स्थलांतरित केले गेले आहे, ते ते पुन्हा परभणीत व पूर्णा येथे आणून कार्यान्वित करावे व या शहरांची गेलेली शान अबाधित ठेवावी अशी आमची आग्रहाची मागणी राहील. जसा प्रयत्न आयकर कार्यालयासाठी केला तसाच जालना येथे पळवून नेलेल्या कामगार न्यायालयासाठी करावा, तसाच प्रयत्न पूर्णा येथून पळविलेलल्या रेल्वेच्या वाढीव विकासात्मक विभागासाठीही जीवापाड असे करावेत आणि पूर्णा-परभणीच्या विकासाला जाणीवपूर्वक पाडली जाणारी खिळ दूर करावी अशी दै.चालू वार्तातर्फे विनम्र प्रार्थना राहाणार आहे.
सन १९६३ पासून स्वमालकीच्या इमारतीत असलेले आयकर कार्यालय सन २२ मध्ये ते अचानक बंद करुन हिंगोलीत मात्र भाड्याच्या जागेत पळवले. केवढा हा मस्तवाल तुघलुकीपणा म्हणायचा ? महम्मद चोरी, मोहम्मद तुघलूक जावून असंख्य वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी यांच्या रक्तात मात्र अजूनही तोच तुघलुकीपणा वळवळतोय. हे शर्मनाक असले तरी सत्तेमुळे बेभान झालेल्या ज्या कोणी हे कृत्य केले आहे, त्यांना काहीच कसे वाटले नसावे ? त्याचा त्रास यांना नव्हे तर परभणी जिल्ह्यातील समस्त करदाते, चार्टर्ड अकाऊंटंट आणि कर सल्लागार यांना मात्र सलग दोन वर्षे सोसावा लागला आहे.
परभणी जिल्ह्यातील सयंमी जनतेवर ज्या ज्या वेळी अन्याय होईल, जाणीवपूर्वक केला जाईल, त्याविरोधात चालू वार्ता हे दैनिक सातत्याने आवाज उठविण्यासाठी प्रयत्नशील राहील. तथापि चांगलं काम ज्या कोणाकडूनही होईल, त्यांचे कौतुकही करायला आम्ही घाबरणार नाही. तथापि उठा, जागे व्हा, तत्परता दाखवा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करुन तीव्र लढा उभारा, असे आमचे कळकळीचे आवाहन या निमित्ताने करीत आहोत एवढे मात्र खरे.


