दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
मागील वर्षी तालुक्यातील ठराविक गावामध्ये फार्मरकर स्पर्धा घेण्यात आली होती यावर्षी लोहा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व शेतकरी गट फार्मर कप स्पर्धा 2023 स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात. गतवर्षी खरीप हंगामातील पिकांसाठी घेतलेली स्पर्धा व या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांना मिळालेले यश पाहून यावर्षी ही स्पर्धा आपल्या लोहा तालुक्यातील सर्व गावांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यस्तरीय तालुकास्तरीय गटांना बक्षीस ही ठेवण्यात आलेले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत व शेतकरी गटांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिंगारे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी गावामध्ये पीक निहाय गट तयार करून उत्पादन खर्चात बचत करणे व उत्पादन वाढवणे या स्पर्धेचे मुख्य ध्येय असून मागील वर्षीही शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला. या स्पर्धेदरम्यान शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणातून शेतीचे नव्या सुधारित पद्धती, ऑनलाइन डिजिटल शेती शाळा, एकात्मिक कीड व्यवस्थापन, इर्जिकच्या माध्यमातून मजुरांची भेडसावणाऱ्या समस्येवरही काम केले आहे. डिजिटल शेती शाळेमध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून नवीन ज्ञान आत्मसात केले गेले व शेतात त्याची अंमलबजावणी केली गेली व त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढल्याचे गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये दिसून आले.
यावर्षी ही स्पर्धा तालुक्यातील सर्व गावांसाठी खुली असणार आहे व राज्यस्तरीय प्रथम बक्षीस 15 लाख रुपये, द्वितीय बक्षीस 10 लाख रुपये, तृतीय बक्षीस 5 लाख रुपये. राज्यस्तरावर उत्कृष्ट काम करणारा महिला गटास 5 लाख रुपये, तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी गटास 1 लाख रुपये, सर्वाधिक कार्यक्षम शेतकरी गट असणारे ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये ठेवण्यात आलेले असून या स्पर्धेचा कालावधी 15 मे 2023 ते 31 जानेवारी 2023 असेल. ही स्पर्धा खरीप हंगाम पिकासाठी राहील.
अधिक माहितीसाठी तालुका समन्वयक राजाभाऊ कदम व सिद्धार्थ कवडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संतोष शिनगारे यांनी केले आहे


