
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहर व जिल्ह्याच्या राजकारणावर दिलखुलासपणे बोलत असलेले दोन मातब्बर भिडू. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतरही कसलीच चिंता नसलेले हे खंदे राजकारणी निवडणूकीदरम्यान थोडे इकडे तिकडे झाल्याचे वाटणारे दिसले गेले तरी ते एकच आहेत हे त्यांच्या कार्यशैलीतून दिसत असते. एक आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयजी जाधव तर दुसरे आहेत परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहूल पाटील. सरकार बदलले असल्याने त्यांची मोठी अडचण होणार, तेही शिंदे यांच्या गटात सामील होणार, असे निरनिराळे आराखडे बांधणारे अनेकजण त्यांच्या विषयी मागील काही दिवसांपासून बोलत होते. तथापि ज्यांनी ज्यांनी तसे आराखडे व्यक्त केले होते, ते सर्व खोटे ठरवत या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्याचा तथा विद्यमान सरकारवर शाब्दिक हल्ले करण्याची एकही संधी सोडली नाही. मग ते सभागृह असो वा सभागृहाबाहेर, त्यांनी मतदार नागरिकांसाठी हाती घेतलेले प्रश्न महत्वाचे असूनही शासन त्यासाठी घेत असलेली सापत्न भावाची वागणूक त्यांनी वारंवार जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे. आगामी काही महिन्यांनंतर असलेल्या निवडणूकांविषयी काळजीची यत्किंचितही छटा नसल्याचे त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांवरुन स्पष्ट होत आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते खंदे शिलेदार आहेत. परभणी विधानसभा असो वा लोकसभा या क्षेत्रांवर त्यांची आपापली पक्कड घट्ट असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या राजकारणात कितीही बदल झाले तरी त्यांना पराजयाची धूळ चारणारा सध्या तरी कोणीच नसल्याचे ते ठामपणे सांगत आहेत. एवढा ठाम विश्वास त्यांच्या कार्यावर आणि मतदारांवर आहे. किंबहुना निष्ठावान शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, स्नेही, आप्तेष्ट आणि समस्त मतदार राजे यांच्याकडून या दोन्ही नेत्यांवर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले जाते.
परभणी विधानसभा असो वा लोकसभा या दोन्ही मतदारसंघांमध्ये उभय नेत्यांना कडवी टक्कर देणारा प्रबळ असा कोणीही उमेदवार नसल्याने भविष्यात म्हणजेच आगामी निवडणुकीत त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेष असल्याचे सांगितले जाणे स्वाभाविक आहे. शिवाय ज्यांच्या नसानसात ठासून शिवसेना भरली आहे आणि भगव्याप्रति ओतप्रोत असलेली भरलेली निष्ठा असा त्यांचा प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता विजयाच्या उन्मादाने सांगत आहे, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.
मागील काही कालावधी पासून या दोन्ही नेत्यांनी धार्मिक, सांस्कृतिक सामाजिक, आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांवर कमालीचा जोर लावला आहे. नानाविध कार्यक्रमांच्या उपक्रमातून त्यांनी संत-महात्मे आणि सुप्रसिद्ध अशा ह.भ.पारायणकारांच्या माध्यमातून ते परमेश्वरालाच आळवणी घालण्याचे कार्य सुरु ठेवले आहे तर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समस्त मतदारांना गवसणी घालण्याचे महत्प्रयासी व लोकाभिमुख असे कार्य पार पाडत भाविक-भक्त-मतदारांची मने जिंकली आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना फोडण्यासाठी किंवा आपलेसे करुन घेण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न चालविले असतील किंवा कितीही आणाभाका केल्या तरी ते सर्व निरर्थक असेच ठरले जाईल असे बोलले गेल्यास आश्चर्य वाटू नये. कोणाचाच पायपोस कोणामध्येच नसल्याने विरोधकांची सुध्दा येथे मोट बांधली जाणे अशक्यप्राय असल्याचे सध्या तरी दिसत आहे. किंबहुना त्यासाठीच या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यांवर आनंदाची छटा ओसंडून वाहत असल्याचे दिसले गेल्यास आश्चर्य वाटू नये.