
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड दि.5 (प्रतिनिधी ) ‘ असे दांडगी इच्छा ज्याची , मार्ग तयाला मिळती सत्तर , नजर रोखुनी नजरेमध्ये , आयुष्याला द्यावे उत्तर ! ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटात ही मार्ग सापडतात . संकटांचा हसून सामना करावा , तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे , असा संदेश गुरु ठाकूर या कवीने दिला आहे . त्याच प्रमाणे डॉ. त्र्यंबक विठ्ठलराव दापकेकर यांनी आपल्या आयुष्यात रुग्णसेवेचा वसा हाती घेवून केवळ नांदेडमध्येच नाही तर पुणे येथे म्हणजेच संबंध महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. रूग्ण सेवेचे हे कार्य सतत व्रतस्थपणे जबाबदारीने सुरु आहे. कुठेही अपघात झाला की , प्रथम आठवते ते नाव म्हणजे डॉ. त्र्यंबक दापकेकर .. रुग्णांचे प्राण वाचले की , रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना तुम्ही देवदूतासारखे धावून आलात नाहीतर रुग्ण दगावला असता असे उद्गार काढत असतात. त्यांच्या दृष्टीने डॉक्टर हा देवदूतच असतो. असे हजारों रुग्णाचे प्राण वाचविणारे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. त्र्यंबक दापकेकर .
डॉ. त्र्यंबक दापकेकर वयाची साठ वर्ष पूर्ण करून ६ मार्च २०२३ रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत . अर्थातच त्यांचा हा साठावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख.
डॉ. त्र्यंबक विठ्ठलराव दापकेकर यांचा जन्म मुखेड तालुक्यातील दापकाराजा या गावी ६ मार्च १९६३ रोजी एका शेतकरी कुटूंबात झाला. त्यांच्या आईचे नाव गुंडाबाई होते. त्यांचे कुटूंब म्हणजे गावातील सर्वात मोठे आणि आदर्श कुटूंब होते. त्यांना चार भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. वडीलभाऊ डॉ. माधवराव , दुसरे उद्धवराव गुरुजी , तिसरे डॉ. व्यंकटराव , चौथे भाऊ मलिकार्जून , केसुबाई, गिरीजाबाई , मंगलबाई अशा तीघी बहिणी . वडीलभाऊ डॉ. माधवराव यांचा मुलगा प्रा. संतोषकुमार दापकेकर हा दापका राजा गावचा विद्यमान सरपंच असून त्यांनीही ग्रामसुधारणेचा ठसा गावामध्ये उमटवला आहे. तसेच दुसरा भाऊ डॉ. व्यंकटराव यांचा मुलगा गिरीष दापकेकर थंड हवेचे ठिकाण पाचगणी येथे नगरपालिका आयुक्त आहे. त्यांना ही परवा राष्ट्रपतीच्या हस्ते सुंदर व स्वच्छ शहर यासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. तिसरा भाऊ मलिकार्जून दापकेकर यांचा मुलगा प्रदीप गावातील शाळेत शिक्षक असून ते स्वतःएक आदर्श शेतकरी म्हणून कार्यरत आहेत .क्षेत्र कोणतेही असले तरीही या कुटूंबाने आपापल्या क्षेत्रात नेत्रदिपक अशी प्रगती केली आहे . हे आम्ही जवळून पाहतो आहे. डॉ. दापकेकराचे आईवडीलही शेती करायचे. मुलाने शिकून मोठे व्हावे अशी आई वडीलांची अपेक्षा . शिक्षणात प्रचंड शक्ती आहे याची जाणीव झाल्यानंतर डॉ. दापकेकर यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या आणि माझ्या वयात एक ते दोन वर्षाचा फरक असेल. मी आणि ईश्वर जोगदंड , भागवत सरकाळे , वसंत पवार अशी पुढे मागे असलेली आम्ही मुले. प्राथमिक शिक्षणावेळीच आम्ही गावात होतो नंतर आमचे मार्ग आणि शाळाही बदल्या. आयुष्याची सर्वोच्च शिखरे गाठत त्यांनी त्यांच्या स्वप्नांना आकार दिला. आयुष्याची दशा करण्यापेक्षा त्याला मेहनत आणि चिकाटीने सुंदर दिशा द्यावी असा संदेश डॉ. दापकेकर यांनी आपल्या यशस्वी वाटचालीतून दिला आहे. आईवडील शेतातली कष्टाची कामे करतात पण त्यांच्या कष्टाला कधीच मनासारखे मोल मिळत नाही. आईवडीलांच्या कष्टाला समाधानाचे फळ मिळवून देण्यासाठी आपण खुप शिकले पाहिजे . शिक्षणात प्रचंड शक्ती आहे हा विचार घेऊन आईवडीलांकडून मिळालेला गुरुमंत्र घेवून ते एका ध्येयाने दापका राजा गावच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण निती निकेतन माध्यमिक विद्यालय जांब बु. येथे झाले ,पण पुढे काय ? याची पुढील पुरेशी दिशा स्पष्ट दिसत नव्हती.
दहावीत प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्याची वार्ता गावभर पसरली. आणि ती माहिती उमरीचे शिक्षक नारायणराव मोटे गुरुजी यांच्या कानावर गेली. त्यांनी त्र्यंबक नावाच्या या हुशार मुलास गुरुजींनी ‘ तू उमरीला ये ‘ मी तुझ्या राहण्याची व्यवस्था करतो म्हणून बोलावणे पाठवले. डॉ. दापकेकरांनी गुरुजीचा शब्द प्रमाण मानून शिक्षणासाठी उमरी गाठली. तेव्हापासून आजपर्यंत डॉ. दापकेकर यांनी आयुष्याची सर्वोच्च शिखर गाठत खऱ्या अर्थांनी आईवडीलाच्या कष्टाला समाधानतेचे फळ मिळवून दिले. परंतू यात त्यांच्या दोन्ही गुरु सोबतच त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सुषमा व मुलगा डॉ. प्राचेत यांचे देखील तेवढेच मोठे योगदान आहे. डॉ. दापकेकर यांचे उमरी येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढे ते वैद्यकिय शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. एम. बी बी.एस चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुखेड तालुक्यातील राजूरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा दिली. त्यामुळेच डॉ. दापकेकर यांना सेवेत कार्यरत असताना राज्यशासनाकडून एम.एस . आर्थोपिडीक पदवी मिळाली. पुढे त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयात पदव्युत्तरचे शिक्षण ही पूर्ण केले. दरम्यान त्यांना पद्मश्री डॉ. शरद हर्डीकर यांच्या संस्कारात वाढलेल्या डॉ. त्र्यंबक दापकेकर यांनी डॉ. हर्डीकर यांच्याहस्ते १९९६ मध्ये चार खाटांचे हॉस्पीटल सुरु केले. सातत्यपूर्ण काम आणि प्रामाणिकतेच्या जोरावर केवळ सात वर्षात ५० बेडच्या सनराईज ग्लोबल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले . याशिवाय गुरु पद्मश्री डॉ. शरद हर्डीकर यांचे पुण्यातील शिवाजीनगर भागातील हार्डीकर हॉस्पिटल घेतले. परंतू गुरुकडून मिळालेल्या हॉस्पिटलच्या नावाला धक्का न लावता ७० बेडवरून डेक्कन हार्डीकर नावाने १३० बेडचे मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल केले आहे. गुरुच्या नावाने सुरु असलेल्या या हॉस्पिटलचा केवळ डॉ. दापकेकर यांनाच नव्हे तर ८९ वर्षाचे पद्मश्री डॉ. शरद हार्डीकर आजही तितक्याच आत्मीयतेने या हॉस्पिटल मध्ये चार तास सेवा देतात. नांदेडला सनराईज ग्लोबल मल्टी सुपरस्पेशालिटी नावाने शंभर खाटांचे हॉस्पिटल सुरु आहे. दोन्ही ठिकाणी मिळून पाचशेच्यावर जवळपास तज्ज्ञ डॉक्टर , परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ अतिशय तळमळीने रुग्ण सेवा देत आहेत. नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्स , तत्पर नर्सिंग सेवा , स्वच्छता , सर्व डायग्नॉस्टिक सुविधा एकाच छताखाली रुग्णांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना आपत्कालीन स्थितीत सर्व सुविधा मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. ग्लोबल हॉस्पिटल सबंध मराठवाड्यात एक टर्शरो मेडिकल सेंटर म्हणून नावारूपाला आले आहे. याशिवाय मराठवाड्यातील अवयव प्रत्यारोपण सेंटर म्हणून ग्लोबलची ओळख निर्माण झाली आहे. प्राचेत मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य सेवेचे सामाजिक उतरदायित्व समोर येते . शैक्षणिक कार्य करत असताना प्राचेत शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अंतर्गत जानापूरी येथे जवळपास १७ एकरावर ‘ द पेनेशिया इंटरनॅशनल स्कूल ‘ची उभारणी केली आहे. केवळ वैद्यकिय नव्हे तर सामुहिक विवाह सोहळ्यातही फाऊंडेशनतर्फे महत्वाचे योगदान दिले आहे. एकुणच डॉ. दापकेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला उभे करताना इतरांचा आधार होण्याचेही काम केले. हा अखंड प्रवास अविरतपणे सुरु असताना अनेक अडथळेही आले. मात्र त्याच वेळी प्रत्येक टप्प्यावर अतिशय चांगले गुरु , मित्रही डॉ. दापकेकर यांना भेटत गेले. डॉ. दापकेकर यांनी हे स्वप्न एकट्याने बघितले असलेतरी त्यांच्या यशात तज्ज्ञ डॉक्टर्स , नर्सिंग स्टॉफ , त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद व परिवाराची साथ त्यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याशिवाय हे स्वप्न पूर्णत्वास गेले नसते. त्यांच्या या स्वप्नास आकार देण्यासाठी कळत न कळत अनेकांचा हातभार लागला आहे. या भागीदारीत अहोरात्र सोबतीला असलेल्या सुशिल पत्नी डॉ. डॉ. सुषमा दापकेकर व मुलगा डॉ. प्राचेत दापकेकर यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच स्वप्नवत वाटणार जग सत्यात उतरू शकल्याचे डॉ. दापकेकर मोठ्या अभिमानाने सांगतात.
‘ असे जगावे छाताडावर , आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये ,
आयुष्याला द्यावे उत्तर !
या वरील ओळीप्रमाणे डॉ. दापकेकरांनी आपल्या आयुष्यात रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे असे समजून अविश्रांत व व्रतस्थपणे कार्य केले. त्यांची जिद्द , चिकाटी , शिस्त , वक्तशीरपणा या त्यांच्या अंगी असलेल्या सद्गुणामुळे इतरांना ते कडक स्वभावाचे वाटतात पण ते तसे नसून ते अतिशय हळव्या मनाचे संवेदनशिल व्यक्तिमत्वाचे एक लोकप्रिय डॉक्टर आहेत. त्यांचे सामाजिक , शैक्षणिक , रुग्ण सेवा व्रतस्थपणाच्या कार्याची दखल घेवून त्यांना नांदेड लोकमत ऑयकॉन पुरस्कार , नांदेड सकाळ ऑयकॉन पुरस्कार तसेच राज्यस्तरावरचा पुणे बेस्ट मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल टॉईम्स ऑफ इंडिया ग्रुप चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
रुग्ण सेवेतील प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर ६ मार्च २०२३ रोजी ते साठी संपून एकसष्टाव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत आहेत. उर्वरित आयुष्यातही त्यांना निरोगी निरामय व सुख समृद्धीचे आयुष्य लाभो . त्यांच्या हातून अजूनही हजारों रुग्ण बरे होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
डॉ. त्र्यंबक दापकेकर यांना वाढदिवसानिमित्त
मनस्वी हार्दिक शुभेच्छा !
ज्ञानोबा जोगदंड
संचालक ,
जिजाऊ ज्ञानमंदिर
सेमी इंग्लिश स्कूल मुखेड
जि.नांदेड