
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील साळवींडे ग्रामपंचायतीने पंचक्रोशीतील गाववाडीत नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व्यवस्थापनात उल्लेखनीय काम केले असल्याने ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ ने केंद्रशासनाचे वतीने साळविंडे ग्रुप ग्राम पंचायतीच्या महीला सरपंच सोनल महेश घोले यांचा राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू,जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात देशभरातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या महिलांचा ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’या पुरस्काराने गौरव करण्यात आला.म्हसळा तालुक्यातील साळवींडे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सोनल घोले आणि सन्मानिय सदस्य यांनी खासदार सुनील तटकरे,माजी पालकमंत्री आमदार अदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे, दिवंगत नेते अलीशेट कौचाली यांचे सहकार्याने जल जीवन मिशन योजने अंतर्गत संपुर्ण ग्राम पंचायतीमध्ये पाणी पुरवठा योजनेचे वितरण कामात उत्कृष्ट नियोजन करून प्रत्येक कुटंबाला स्वच्छ जल पुरवठा करण्याचे कामांत सातात्यता राखली असल्याने त्यांचा केंद्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला.सरपंच सोनल घोले यांचा सन्मान सोहळ्याला महामहीम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मु,स्वच्छता आणि पेयजल विभागाचे केंद्रीय मंत्री ना.गजेंद्र सिंह शेखावत,मा.राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल,पेयजल विभागाच्या सचिव विनी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. म्हसळा तालुक्यांतील एकमेव महिला सरपंच सोनल घोले या वरील सन्मानास पात्र झाले असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.