
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- स्त्रीच्या वाट्याला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच आहे. हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे. परंतू आजही स्त्री ला हवा तसा सन्मान भारतीय समाजव्यवस्थेत मिळत नाही तो सन्मान व्यवस्थेने देवून स्त्री कतृत्वाचा सन्मान करावा असे आग्रही प्रतिपादन यूवक नेते डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी केले.
सम्राट मित्रमंडळाच्या वतीने जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने पालिकेतील स्वच्छता करणा-या महिलांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ मूंडे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून सरपंच रामभाऊ चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सय्यद तबरेजभाई,पत्रकार अजय भालेराव यांची उपस्थिती होती.
पूढे बोलताना डाॅ.सूर्यवंशी म्हणाले की,आज महिलांमध्ये नोकरी करणारी स्त्री आणि गृहिणी असे दोन घटक पडले आहेत. ज्यात नोकरदार स्त्रिया स्वत:च्या दिसण्याविषयी विशेष चोखंदळ असतात. पण, त्या तुलनेत गृहिणीना स्वत:च्या अस्तित्वाचा विसर पडत चाललेला पाहायला मिळतोय. ‘घरगुती’ कामांमध्ये त्या इतक्या स्वतःला वाहून घेतात की आपल्या आरोग्याकडेदेखील त्यांना लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
लोकसंख्येच्या तुलनेत स्त्रियांची लोकसंख्या अर्धी आहे. परंतु आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत अर्ध्या समाजघटकाचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून अजूनही अजिबात विचार केला गेलेला नाही. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार अजूनही सुरूच आहेत. शिक्षण, आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास इ. बाबतीत त्यांची सतत पिछेहाटच होत राहिली. स्वातंत्र्यानंतर नऊ पंचवार्षिक योजना अंमलात आल्यात. प्रगती झाली, विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात नेऊन पोहचविण्याचा विचार झाला.परंतू म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही.
स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय संपत्तीत वाढ झाली. पण वितरण आणि विभाजन न्याय्य होऊ शकले नाही. म्हणून आर्थिक विषमतेची दरी रुंदावत गेली. त्याचप्रमाणे स्त्रीघटकाचे झाले. एकीकडे शहरातून व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेकी हव्यास असणारी स्त्री दिसते, तर दुसरीकडे दारिद्रयरेषेखाली जागणारी, अनेक प्रकारच्या कौटुंबिक, सामाजिक बंधनांनी जखडलेली पुरुषप्रधान संस्कृतीत दुय्यम स्थानावर असणारी आणि अन्याय, अत्याचार, हिंसाचार यामुळे जगण्याची उमेद हरवून बसलेली अबला दिसते. यात समन्वय साधावा, काही मध्य मिळावा यासाठी योजनाबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे असेही शेवटी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तबरेजभाई सय्यद यांनी केले तर आभार राणी गायकवाड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू सोनकांबळे,विलास चापोलीकर,संदीप शिंदे, दिलीप भालेराव,प्रदीप कांबळे,मोहम्मद पठाण, सय्यद तबरेज, उमेद कचरे,सत्यपाल वाघमारे, सैय्यद नौशाद,शेख इमरान,पठाण शाहरूख,शेख
नूर मोहम्मद,सचिन बानाटे,अजिंक्य गायकवाड,देवदास ससाने,भैय्यासाहेब भालेराव,अमोल कांबळे, प्रवीण लामतुरे ,रामनगर नागरगोजे, सुधीर तांबटकर,किरण वाघमारे, शिवानंद पांचाळ ,अनिल गायकवाड,अजय गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.