
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
भोर :- सागरामार्गे होणाऱ्या व्यापारी मालवाहतूकीशी संबंधित असलेल्या मर्चंट नेव्ही या क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या तालुक्यातील युवकांना या क्षेत्राविषयी माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून भोर येथील राजा रघुनाथराव महाविदयालय येथे मर्चंट नेव्ही करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या क्षेत्रात कार्यरत असलेले कॅप्टन नवनाथ किंद्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
युवकांनी पारंपारिक शिक्षणपद्धती सोबतच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी विवीध क्षेत्रांमध्ये असलेल्या संधी शोधून तसा प्रयत्न केल्यास त्यांना यश नक्की मिळते मात्र त्यांना आवश्यकता असते ती त्या क्षेत्रातील परिपूर्ण माहिती व मार्गदर्शनाची. ती जर त्यांना वेळेत आणि व्यवस्थितपणे मिळाली तर त्यांचा त्या दिशेचा प्रवास हा अधिक सोयीस्कर होतो या उद्देशाने भोर येथील श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात प्रथमच अशा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास विध्यार्थ्यांसह पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सायली बांदल यांनी केले तर तुषार साळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.