
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना – जिल्ह्यातील जालना नगरपरिषदेचे संपूर्ण स्थानिक क्षेत्र, नगर परिषद क्षेत्र म्हणून बंद करण्याच्या उद्देशाने नगर विकास विभागाकडून अधिसुचना काढण्याचा उद्देश घोषित करण्यात आला आहे. या उद्घोषणेच्या संदर्भात कोणासही आक्षेप असल्यास ते लेखी स्वरुपात कारणांसह तीस दिवसांच्या आत जालना जिल्हाधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक असणार आहे. दिलेल्या कालावधीत नोंदवलेल्या आक्षेपांचा शासनाकडून विचार करण्यात येणार असल्याचा उल्लेख राजपत्रात आहे.
प्रारुप अधिसुचनेनुसार आक्षेपांचा विचार करून येत्या आठ जून अथवा त्यानंतर जालना नगर परिषद क्षेत्र म्हणून बंद करण्यात येऊन जालना शहर महानगर पालिका घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे जालना महानगरपालिका घोषित होण्यासाठी तीस दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सदरील आदेश अधिसुचना राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाच्या उप सचिव विद्या हम्पय्या यांनी जारी केले.